शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य; विद्यमान खासदाराविरोधात शिवसैनिकांनी पुकारलं बंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 09:18 AM2024-03-13T09:18:49+5:302024-03-13T09:20:06+5:30

सदाशिव लोखंडे यांचा उत्तर नगर जिल्ह्यात संपर्क फार कमी आहे. गेल्या १० वर्षात त्यांनी कुठलीही विकासकामे केली नाहीत असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

Shiv Sena MP Sadashiv Lokhande is angry among the party workers | शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य; विद्यमान खासदाराविरोधात शिवसैनिकांनी पुकारलं बंड

शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य; विद्यमान खासदाराविरोधात शिवसैनिकांनी पुकारलं बंड

शिर्डी - आगामी लोकसभा निवडणूक कुठल्याही क्षणी लागू शकते अशावेळी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. शिर्डी मतदारसंघ भाजपाला मिळावा यासाठी महायुतीत भाजपा नेते आग्रही आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी लोखंडे नको, दुसरा सक्षम उमेदवार द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. 

सदाशिव लोखंडेंविरोधात मतदारसंघात नाराजी आहे. जर त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर उत्तर नगरमधील शेकडो पदाधिकारी राजीनामा देतील असा इशाराही पक्षनेतृत्वाला दिला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आणि माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेत खासदार लोखंडे यांना उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. शिवसेनेने लोखंडेऐवजी सक्षम उमेदवार द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं जगताप यांनी सांगितले. 

सदाशिव लोखंडे यांचा उत्तर नगर जिल्ह्यात संपर्क फार कमी आहे. गेल्या १० वर्षात त्यांनी कुठलीही विकासकामे केली नाहीत. पदाधिकारी म्हणून आम्हाला कधीही विश्वास घेतले नाही. देवकरांसारख्या प्रमाणिक कार्यकर्त्याला जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार केले असा आरोप अनिता जगताप यांनी केला आहे. 

यावेळी श्रीरामपूर महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पूनम जाधव, संगमनेर तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख अर्जुन काशिद, अकोले तालुक्यातील राजूर शहरप्रमुख विक्रम जगदाळे, श्रीरामपूर तालुकाप्रमुख बापूसाहेब शेरकर, युवा शहरप्रमुख रामपाल पांडे, राहाता उपतालुकाप्रमुख सुभाष उपाध्ये, शिर्डी शहर संघटक नानक सावंत्रे आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांच्याकडे सुपूर्द केले.  करण जगताप, राजेंद्र व्यवहारे, राजेंद्र दाभाडे, शाकीर शेख, भीमा गणकवार, हरी शेलार, किशोर सुर्वे, प्रकाश जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सदाशिव लोखंडे यांनी आरोप फेटाळले

शिर्डी व मतदारसंघात केलेल्या कामाची लिस्टच देतो, आरोप करणारे अनेक कामांचे साक्षीदार आहेत. जाणूनबुजून अंधळ्याचे सोंग करणाऱ्याला कामे कशी दिसणार?, जिल्हा प्रमुखाने वारंवार निरोप देऊनही जगताप पती- पत्नी बैठकांना येत नाहीत, पदाधिकाऱ्यांच्या निवडी सर्वांना विचारात घेऊन व पक्ष पातळीवर ठरत असतात. त्यांना शहर प्रमुख पद पाहिजे होते असं सांगत खासदार सदाशिव लोखंडे यांनी आरोप फेटाळले.

Web Title: Shiv Sena MP Sadashiv Lokhande is angry among the party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.