शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 18:28 IST2024-10-31T18:26:15+5:302024-10-31T18:28:11+5:30
Maharashtra Election 2024: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युतीतील जागावाटपाच जुना किस्सा सांगत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीमध्येउद्धव ठाकरे यांची शरद पवार आणि काँग्रेसने फसवणूक केली असून, रामटेक मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराची जमानत जप्त करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक लढत असून, रामटेकमध्ये उद्धव ठाकरेंचा ठरवून अपमान केला आहे", अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना लक्ष्य केले.
नागपूर विमानतळावर माध्यम प्रतिनिधींशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधला. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बंडखोरी करीत असताना तो नाना पटोले यांना दिसत नाही, असे म्हणत बावनकुळेंनी काँग्रेसलाही घेरले.
युती तोडल्याची करून दिली आठवण
चार जागांसाठी उद्धव ठाकरेंनी भाजपासोबतची युती तोडली होती. उद्धव ठाकरे यांचा भाजपाकडून सन्मान केला जात होता, अशी आठवण बावनकुळेंनी करून दिली. ते म्हणाले, युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे बरोबरीने आणि भाजपापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढत होते. लोकसभा निवडणुकीत त्यांचे अठरा खासदार निवडून आले होते. आता ते मुख्यमंत्रीपदाच्या लोभामुळे फसले आहेत. त्यांनी आपला हिंदुत्वाचा विचार सोडला आहे", अशी टीका बावनकुळे यांनी केली.
अर्ज मागे घ्या, अन्यथा कार्यवाही; भाजपच्या बंडखोरांना इशारा
"एका मतदारसंघातून एक व्यक्तीच उमेदवारी अर्ज भरू शकतो. ज्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. निवडणूक संचालन समितीने अशा पदाधिकाऱ्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेतले जातील असा विश्वास व्यक्त केला. जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल", असा इशारा बावनकुळेंनी भाजपच्या बंडखोरांना दिला.