शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:27 IST2026-01-10T18:25:10+5:302026-01-10T18:27:32+5:30
कुटुंब म्हणून एखाद्या कार्यक्रमात एकत्र येणे हे दिसून येते परंतु मूळ ढाचा बदलणार नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि शरद पवारांचा पक्ष एनडीए विरोधी आहे असं प्रफुल पटेल यांनी सांगितले.

शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
मुंबई - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. त्यामुळे भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चा केवळ अफवा आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. आम्ही मोदींच्या नेतृत्वात एनडीएमध्ये आहोत आणि शरद पवार हे एनडीएविरोधात आहेत. त्यामुळे स्थानिक निवडणुकांवरून राज्यातलं आणि देशातील राजकारणात फार काही बदल होणार नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.
प्रफुल पटेल यांनी म्हटलंय की, स्थानिक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी एडजेस्टमेन्ट होत आहे. त्यातून महाराष्ट्रातलं आणि देशातील राजकारण बदलेल असं होत नाही. आम्ही देशात एनडीएमध्ये आणि महाराष्ट्रात महायुतीत आहोत त्यात काही बदल होणार नाही. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी आमनेसामने लढत आहेत. हे केवळ स्थानिक पातळीवर आहे त्याचा मोठा अर्थ काढू नका. कुटुंब म्हणून एखाद्या कार्यक्रमात एकत्र येणे हे दिसून येते परंतु मूळ ढाचा बदलणार नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि शरद पवारांचा पक्ष एनडीए विरोधी आहे. भाजपाविरोधात इंडिया आघाडीत त्यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे छोट्या निवडणुकांना मोठ्या राजकारणाशी जोडू नये असं त्यांनी सांगितले.
तसेच अनेक अफवा सुरू आहेत परंतु त्यात कुठेही बदल होणार नाही. निवडणुका असल्याने अनेक अफवा पसरतात. मात्र मी अधिकृत खुलासा करतो. यापुढच्या दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही परिवर्तन होणार नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. त्यात कुठेही चर्चा झाली नाही. त्यामुळे उद्या काय होईल याचा विचार लोक करत आहेत परंतु तसे काही नाही. निवडणुकीच्या भाषणात, मुलाखतीत एखादं विधान केले त्यातून राजकारणाची दिशा ठरत नाही असंही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईत आमचे नेते नवाब मलिक आहेत. त्यांची मुलगी आज आमदार आहे. विधानसभेलाही भाजपाने मलिकांवर आरोप केले तरीही आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवली. त्यानंतर सरकारही बनवलं. आम्ही मलिकांना कधीही वेगळ्या नजरेने पाहिले नाही. भाजपा ज्याप्रकारे आरोप करते, त्यावर आम्ही संयमी भूमिका घेतो त्याचा अर्थ आम्ही कमकुवत आहोत असं कुणी समजू नये असंही प्रफुल पटेल यांनी म्हटलं.