'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:19 IST2026-01-09T12:18:47+5:302026-01-09T12:19:51+5:30
Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Election 2026: ‘भाजपाची अवस्था ही पिंजरा नावाच्या चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. मास्तर तमाशा बंद करायला आले होते पण मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुणतुणं घेऊन पुढे उभा राहिला’, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपावर केली आहे.

'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
सांगली - सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिप्पणी केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपावर जोरदार टीका केली आहे. ‘भाजपाची अवस्था ही पिंजरा नावाच्या चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. मास्तर तमाशा बंद करायला आले होते पण मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुणतुणं घेऊन पुढे उभा राहिला’, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपावर केली आहे.
भाजपने अकोट येथे एमआयएम आणि अंबरनाथ येथे काँग्रेस पक्षाशी केलेल्या युतीबाबत बोलताना जयंत पाटील यांनी हा टोला लगावला. यावेळी "ये बंद करने आए थे तवायफोके कोठे, मगर सिक्को की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे..." अशी शेरोशायरी करत जयंत पाटील यांनी भाजपाची खिल्ली उडवली.
यावेळी १९९६ सालची आठवण करून देत जयंत पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नेते स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपला जास्त जागा मिळाल्या पण त्यांच्याकडे बहुमत नव्हते. त्यांना वेगवेगळ्या पक्षांना एकत्र करून सरकार बनवता आले असते, पण त्यांनी ते केले नाही. मात्र आज भाजपा काय करतेय? सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपात नेले आहेत. भाजपा सांगतात ते हिंदुत्ववादी आहेत मात्र त्यांनी अकोल्यात एमआयएम सोबत युती केली आहे. ज्या ओवेसींवर जोरदार टीका केली. आता त्याच ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, हे लक्षात घ्या. सत्तेसाठी कोणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजपा आता काँग्रेसयुक्त झाला आहे. सांगली शहराने स्व. वसंत दादा पाटील यांचे विचारी नेतृत्व पाहिलेले आहे. आपण सर्वांनी विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
या शहरात जो विकास झाला तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेला आहे. रक्त तपासणीसाठी सर्व व्यवस्था आपण मोफत किंवा माफक दरात शहरात उपलब्ध करून दिली. बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी बाजार कट्टा निर्माण केला. वंदेश वाडी हॉस्पिटलला सुमारे पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. आरोग्य शिबिरे घेतली. कृष्णघाट उभारला. सांगली मिरज चौपदरीकरणाची सुरुवात केली. सांगलीला डीएसपी कार्यालय उभारले. घरपट्टी वाढीविरोधात आवाज उठवला. ड्रेनेज सिस्टीमसाठी मंजुरी मिळवली. चैत्रबन नात्यासाठी १० कोटी दिले. भाजपने आठ वर्षात काय केले? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.