आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:00 IST2025-12-24T12:59:05+5:302025-12-24T13:00:04+5:30
Raj Thackeray -Uddhav Thackeray Alliance: आता जर चुकाल तर संपाल, फुटाल तर पूर्णपणे संपून जाईल. तुटू नको, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी युतीच्या घोषणेवेळी मराठी माणसांना केले.

आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
Shiv Sena UBT MNS Alliance: गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता ज्याची प्रतिक्षा करत होती, ती शिवसेना-मनसे युतीची घोषणा आज आम्ही जाहीर करतोय. कोण किती जागा लढवणार याचे आकडे आम्ही सांगणार नाही परंतु जे उमेदवार असतील त्यांना कळवले जाईल असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा केली.
या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे मी माझ्या मुलाखतीत सांगितले होते, त्यानंतर पुढे सुरुवात झाली. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवण्याची टोळी फिरतेय. त्यात २ टोळ्या वाढल्यात ते राजकीय पक्षाची मुले पळवतात. बरेच दिवस ज्याची प्रतिक्षा महाराष्ट्र करत होता. शिवसेना-मनसेची युती झाली हे आज आम्ही जाहीर करतोय. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असं त्यांनी म्हटलं.
तर महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची ही युती आहे. मराठी माणूस सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही. त्याच्या वाटेला कुणी आले तर त्याला सोडत नाही. आज मुंबईचे लचके तोडायचे काम सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या ५ लढवय्यांमध्ये प्रबोधनकार होते. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यासाठी खूप मोठा संघर्ष आहे. आज केवळ महाराष्ट्र नाही तर अख्खा देश बघतोय. विधानसभेवेळी भाजपाने अपप्रचार केला होता बटोगे तो कटोगे..तसेच आता मी मराठी माणसांना आवाहन करतोय, आता जर चुकाल तर संपाल, फुटाल तर पूर्णपणे संपून जाईल. तुटू नको, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी युतीच्या घोषणेवेळी मराठी माणसांना केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण
दरम्यान, मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे. आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या ५ लढवय्यांमधील एक होते. माझे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील श्रीकांत ठाकरे हे अख्खं ठाकरे घराणे मुंबईसाठी संघर्ष करत होते. मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर जेव्हा मराठी माणसांच्या उरावर उपरे नाचायला लागले त्यावेळी न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. साधारण ६० वर्ष होत आली इतकी वर्ष झाल्यानंतर आता मुंबईचे लचके तोडण्यासाठी त्यावेळी ज्यांना मुंबई हवी होती त्यांचे प्रतिनिधी दिल्लीत बसले आहेत त्यांचे मनसुबे आहेत. आता जर आपण भांडत राहिलो तर तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा, हुतात्मा स्मारकाचा अपमान होईल. आज आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलोय. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावर कुणी वाकड्या नजरेने आणि कपटी कारस्थानाने मुंबईला मराठी माणसांपासून आणि महाराष्ट्रापासून वेगळे करणाऱ्यांचा खात्मा करू ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.