Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:39 IST2025-12-24T13:35:07+5:302025-12-24T13:39:34+5:30
Raj Thackeray -Uddhav Thackeray Alliance: जे निवडणूक लढवणार आहेत त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
Shiv Sena UBT MNS Alliance: आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांच्या उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली. परंतु सध्या ही युती मुंबईपुरती जाहीर केली असून इतर महापालिकांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचंही समोर आले आहे. त्याशिवाय मुंबईत कोण किती जागा लढवणार याबाबतही ठाकरे बंधूंकडून सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू सावधपणे पाऊले उचलत असल्याचं यातून दिसून येते.
या पत्रकार परिषदेत उद्धव आणि राज यांना जागावाटपाबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, कोण किती जागा लढवणार, आकडा काय हे सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवण्याची खूप टोळी फिरतेय. त्यात आणखी २ टोळ्या वाढल्या आहेत ते राजकीय पक्षामधील मुले पळवतात. जे निवडणूक लढवणार आहेत त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे हे कळवले जाईल असं सांगत राज यांनी जागावाटपावर सस्पेन्स कायम ठेवला.
तर ही घोषणा सध्या मुंबईपुरती असली तरी बाकीच्या महापालिकांमधील युतीवर आज आणि उद्यापर्यंत शिक्कामोर्तब होईल. नाशिकमध्येही युती झाली आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. आज आम्ही शिवसेना-मनसेची युती जाहीर केली आहे. इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. भाजपातील जे अस्सल मराठी प्रेमी आहेत तेदेखील युतीत येऊ शकतात. महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना जे हवंय ते आम्ही पाहू असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
"माझ्याकडेही खूप व्हिडिओ आहेत..."
दरम्यान, जुन्या व्हिडिओवरून हिंदुत्वावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचाही एक व्हिडिओ फिरतोय ज्याते अल्लाह हाफिज असं बोलतायेत. त्यामुळे या गोष्टी मला कुणी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत. समोरचे काय बोलतायेत त्यावर माझे व्हिडिओ तयार असतील असा सूचक इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.