मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकरांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:30 IST2026-01-08T09:29:05+5:302026-01-08T09:30:09+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray Interview news : मुंबईतील 'एअर क्वालिटी इंडेक्स' (AQI) १८३ वर गेल्याचा दाखला देत मांजरेकर म्हणाले की, "मुंबई आता 'डिकंपोज' कधी होणार? विकासाच्या नावाखाली शहराचा श्वास कोंडला जात आहे.

मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकरांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त...
मुंबई: "मी जेव्हा आज घरातून बाहेर पडतो, तेव्हा मला मुंबईकर म्हणून लाज वाटते. माझी मुले याच शहरात वाढणार आहेत, याचा विचार केला की भीती वाटते," अशा अत्यंत टोकदार आणि भावनिक शब्दांत प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुंबईच्या सद्यस्थितीवर आपली खंत व्यक्त केली. 'सामना'च्या विशेष मुलाखतीत त्यांनी मुंबईतील वाढते प्रदूषण आणि ढासळत्या पायाभूत सुविधांवरून प्रशासनाला धारेवर धरले.
मुंबईतील 'एअर क्वालिटी इंडेक्स' (AQI) १८३ वर गेल्याचा दाखला देत मांजरेकर म्हणाले की, "मुंबई आता 'डिकंजेस्ट' कधी होणार? विकासाच्या नावाखाली शहराचा श्वास कोंडला जात आहे. मुंबई आता विकास करण्याच्या लायकीची राहिली नाहीये, कारण इथे आता जागाच उरलेली नाही." लोंढे थांबवण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी मुंबईच्या वाढत्या गर्दीवरही बोट ठेवले.
उद्धव ठाकरेंचा सरकारवर प्रहार
महेश मांजरेकरांच्या प्रश्नांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या सरकारवर 'नियोजनशून्य विकासा'चा आरोप केला. ठाकरे म्हणाले, "सध्याच्या सरकारची विकासाची गती नाही, तर विनाशाची गती सुरू आहे. सगळीकडे एकाच वेळी रस्ते उकरून ठेवले आहेत. मेट्रो, इमारती आणि रस्ते यांची कामे एकाच वेळी काढल्यामुळे धूळ आणि प्रदूषण वाढले आहे. आम्हीही विकास केला, पण तो नियोजित होता. मुंबईकर प्रामाणिकपणे कर भरतात, पण त्यांना बदल्यात काय मिळते? थेट हॉस्पिटलला जाणारे रस्ते? हे विकासाचे लक्षण नाही."
पुणे की मुंबई? मांजरेकरांचा अनुभव
मुंबईतील गर्दीला कंटाळून सहा महिन्यांसाठी पुण्याला शिफ्ट झालो होतो, पण सहा महिन्यांत पुन्हा मुंबईतच परतलो. मात्र, आताची परिस्थिती पाहता मुंबईतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जागतिक स्तरावर चिंताजनक असल्याचे मांजरेकर यांनी नमूद केले.