शिंदे, फडणवीसांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 13:26 IST2024-08-24T13:24:04+5:302024-08-24T13:26:21+5:30
Raj Thackeray PC News: एकदा राज्य हातात देऊन पाहा, असे आवाहन राज ठाकरे सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत.

शिंदे, फडणवीसांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले...
Raj Thackeray PC News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. २२५ ते २५० जागांवर निवडणूक लढवण्याचा मनसेचा मानस आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील विविध भागात दौरे करत आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी काही मतदारसंघांचा आढावा घेऊन उमेदवारही जाहीर केले. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता.
नागपुरात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना धरून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. जातीचे विष पवारांनी कालवले. संतांची आडनावे राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली. महापुरुषांची विभागणी राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच केली जाऊ लागली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
शिंदे, फडणवीसांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का?
विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही उमेदवार जाहीर केले. याचाच संदर्भ घेऊन पत्रकारांनी राज ठाकरेंना शिंदे, फडणवीस यांच्या मतदारसंघाबाबत प्रश्न विचारला. यावर सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार, असे एका वाक्यात सांगत सूचक शब्दांत भूमिका मांडली. यानंतर राज ठाकरे सातत्याने एकदा राज्य हातात द्या, असे आवाहन करत आहेत. यावरही प्रश्न विचारण्यात आला.
राज्यातील जनता एक दिवस हातात राज्य देतील
राज्यातील जनता एक दिवस हातात राज्य देईल. कारण १९५२ सालापासून भाजपा असेच आवाहन देशातील जनतेला करत आला आहे. तेव्हा जनसंघ होता. २०१४ मध्ये भाजपाला सत्ता मिळाली. वेळा लागतो, असा आशावाद राज ठाकरे यांनी व्यक्त केला.