“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:35 IST2025-12-23T15:34:53+5:302025-12-23T15:35:32+5:30
Prakash Ambedkar News: नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. सध्या फक्त चहा-पाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मुलगी पसंत पडली की लगीन लावू, अशी मिश्किल टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
Prakash Ambedkar News: उद्धवसेना आणि मनसे यांच्यातील महापालिका निवडणूक जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून मातोश्री आणि शिवतीर्थावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. १९ वर्षानंतर वरळीच्या ज्या एनएससीआय डोमच्या मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. ठाकरे बंधूंच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हीच घोषणा आता उद्या १२ वाजता होणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. यातच काँग्रेसने दिलेला स्वबळाचा नारा, प्रकाश आंबेडकरांशी होणारी आघाडी, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही, असे ते म्हणालेत. तर मुंबईचे सांगता येत नाही. कारण, आघाडी जाहीर करा आम्ही सांगितले तर तर थांबा म्हणतात. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र जात नाही. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, कुणासोबत जायचे. काँग्रेससोबत मुंबईत अद्याप जागा वाटपावर बोलणी सुरू झाली नाही. मात्र, ५० टक्के जागावाटपांवर आम्ही ठाम असल्याचे म्हणाले. कारण, आम्ही नगरपालिकेत काय आहोत, ते दिसले आहे. दुसरीकडे आम्ही मुंबईत २०० जागांवर आमची तयारी आहे. आमचा आग्रह ५०-५० टक्के जागांचा असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुलगी पसंत पडली की लगीन लावू
नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. तर सध्या फक्त चहा-पाण्याच्या चर्चा सुरू आहेत. तर मुलगी पसंत पडली की लगीन लावू, अशी मिश्किल टिप्पणी करत प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या चर्चांवर भाष्य केल आहे. अकोला महापालिकेत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याचे तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राज्यातील नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महानगरापालिका निवडणुकीत युतीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
दरम्यान, राज्यातील नगर परिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीही काँग्रेस आणि 'वंचित' मध्ये युतीच्या घडामोडी सुरू झाल्या असून, त्यादृष्टीने सोमवार २२ नोव्हेंबर रोजी दोन्ही पक्षांत मुंबई येथे चर्चादेखील सुरू झाली. चर्चेदरम्यान जागा वाटपाच्या या 'फार्म्युल्या'वर सहमती झाल्यानंतर मनपाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि 'वंचित'मधील युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वंचितच्या विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली.