न भूतो, न भविष्यती...! विधानसभेत सख्ख्या भावांच्या दोन जोड्या दिसणार; असा योगायोग की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:25 IST2024-12-06T13:24:17+5:302024-12-06T13:25:26+5:30
Rane, Samant Brothers: महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असणार आहे. ही किमया केली आहे कोकणातील राणे बंधू आणि सामंत बंधुंनी. आणखी एक योगायोग खातेवाटप झाल्यावर होणार...

न भूतो, न भविष्यती...! विधानसभेत सख्ख्या भावांच्या दोन जोड्या दिसणार; असा योगायोग की...
- हेमंत बावकर
यंदाची विधानसभा खूप खास ठरली आहे. सख्ख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत जाणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असणार आहे. ही किमया केली आहे कोकणातील राणे बंधू आणि सामंत बंधुंनी. आणखी एक योगायोगाची बाब म्हणजे चौघांचेही मतदारसंघ एकमेकांना लागून सलग आहेत. असा विक्रम मोडणे नजीकच्या काळातच नाही तर पुढची अनेक वर्षे कोणाला शक्य होणार नाही.
शिवसेनेकडून उदय सामंत हे रत्नागिरी मतदारसंघ, किरण सामंत त्याच्या पुढचा राजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर भाजपाकडून नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे कणकवली आणि कुडाळ-मालवण मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्या पक्षात जात निलेश राणे निवडून आले आहेत. हे चारही मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत. या चौघांपैकी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचीही चर्चा सुरु झाली आहे.
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्रिपदांचे वाटप लवकरच होणार आहे. या वाटपात भाजपाला २२, शिवसेनेला १३ तर राष्ट्रवादीला १२ अशी खाती वाटली जाणार असल्याचे समजते आहे. येत्या काही दिवसांत हे चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी शिंदे गटातून सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. यामुळे या चार भावांपैकी कोणाला मंत्रिपद मिळणार याकडेही सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी वासियांचे लक्ष लागले आहे.
तिसऱ्यांदा आमदार झालेले नितेश राणे देखील मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. ते भाजपाचे असल्याने भाजपाच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शिवसेनेतून मंत्रिपदाचे दावेदार आहेत. नितेश राणे हे नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या वैभव नाईकांना पाणी पाजून विधानसभेत पहिल्यांदाच पोहोचले आहेत. त्यापूर्वी ते काँग्रेसचे खासदार होते. पहिलीच टर्म असल्याने निलेश राणेंऐवजी नितेश राणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच सामंत बंधूंमध्येही होण्याची शक्यता आहे.
उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचीही आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे. तर उदय सामंत यांनी ठाकरे आणि शिंदे या दोघांच्याही सरकारमध्ये मंत्रिपद भूषविलेले आहे. यामुळे सामंत बंधुमध्येही धाकट्यालाच मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. निलेश राणे हे ज्येष्ठ तर नितेश राणे हे धाकटे आहेत. तर सामंत बंधूंमध्ये किरण सामंत ज्येष्ठ व उदय सामंत धाकटे आहेत.
कोकण पट्ट्यात जर केसरकर, राणे आणि सामंत यांना मंत्रिपदे मिळाली तर तळकोकणात सत्तेची ताकद एकवटण्याची शक्यता आहे. यामुळे चिपळूनपासून ते रायगडपर्यंत मंत्रिपद देऊन शिवसेना, भाजपाला बॅलन्स साधावा लागणार आहे. एनसीपीच्या आदिती तटकरे या भागातून महायुतीच्या मंत्री असण्याची शक्यता आहे.