विधानसभेलाही अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी भाजपची व्यूहरचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 15:11 IST2019-07-30T14:58:00+5:302019-07-30T15:11:36+5:30
राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपमध्ये घेऊन चव्हाणा यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा डाव भाजपकडून आखला जात असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभेलाही अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी भाजपची व्यूहरचना
मुंबई - भाजप-शिवसेनेने फोडाफोडीचे राजकरण करत काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा पक्ष प्रवेशाचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर हे सुद्धा पक्षाला रामराम ठोकून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर गोरठेकर यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध भोकर मतदारसंघातून उतरवण्याची तयारी भाजप करत असल्याची चर्चा आहे. चव्हाण यांना लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत रोखण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपमध्ये घेऊन चव्हाणा यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा डाव भाजपकडून आखला जात असल्याचे बोलले जात आहे. गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आहेत. यापूर्वी जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी विधानसभेतही नायगाव मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यामुळे गोरठेकर यांना उमेदवारी दिली तर चव्हाण यांना विजय मिळवणे नेहमीप्रमाणे सोपे जाणार नाही. तर चव्हाण यांना आपल्या मतदारसंघातच अडवून ठेवण्याचा हा भाजपचा डाव असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
नुकत्याच झालेल्या एका बैठकीत गोरठेकर यांनी सुद्धा अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे. याच बरोबर त्यांनी चव्हाण यांच्यावर टीका सुद्धा केली. आपल्या राजकीय स्वार्थासाठी चव्हाणांनी जिल्ह्यातील दिग्गज राजकीय घराण्यांना घरी बसवले. येत्या काळात हा सर्व हिशोब चुकता करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे लोकसभाप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चव्हाण यांच्यासमोर विरोधकांचा तगडा आव्हान असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मंत्र्यांनी मोठ्याप्रमाणात प्रचार सभा घेतेल्या होत्या. त्यामुळे चव्हाण यांना मतदारसंघात अधिक वेळ द्यावा लागत होता. चव्हाण यांच्यावर पक्षाची राज्यस्तरीय जवाबदारी असल्याने त्यांना नांदेडमध्येच अडकवून ठेवण्याची भाजपची ही खेळी होती. त्यात भाजपला यश सुद्धा मिळाले असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना विजयासाठी नेहमीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.