“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 05:35 IST2026-01-08T05:31:11+5:302026-01-08T05:35:54+5:30
अगोदर ईव्हीएमचे नॅरेटीव्ह पसरवले; आता त्यांचा बिनविरोधला विरोध

“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
लाेकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात महायुतीचे २१ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने काहींना पोटदुखी झाली. पण माझे त्यांना सांगणे आहे की, ‘तुमको मिरची लगी तो मैं क्या करू’, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना बुधवारी टोला लगावला.
यापूर्वी संसदेत ३५ खासदार बिनविरोध निवडून आले होते. त्यापैकी ३३ खासदार हे काँग्रेसचे होते. त्यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आता महायुतीचे उमेदवार निवडून आले तर लोकशाहीची हत्या झाली का, असा सवाल त्यांनी केला. महापालिका निवडणुकीसाठी कल्याण पूर्वेत आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. फडणवीस यांच्या उल्हासनगर व भिवंडी येथेही बुधवारी सभा झाल्या. फडणवीस म्हणाले की, विरोधकांना निवडणुकीसाठी उमेदवार मिळत नव्हते.
‘उल्हासनगरातील गुंडाराज संपवणार’
उल्हासनगर : महापालिका स्थापनेनंतर गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्यांनी उल्हासनगरला काय दिले? उल्हासनगरची अवस्था गावापेक्षाही वाईट आहे. पण, आता हे चित्र बदलायचे आहे. शहरातील गुंडगिरी मोडीत काढून कायद्याचे राज्य प्रस्थापित करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी चार हजार कोटी रुपये देण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. याचं तुम्हाला दु:ख का होते? महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याविषयी विरोधकांकडून नवे नॅरेटिव्ह पसरवले जात आहे. महायुतीचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत जिंकून आले तेव्हा ईव्हीएमचे नॅरेटिव्ह पसरवले. आता बिनविरोधला विरोध करण्यास विरोधकांनी सुरुवात केली.
भिवंडीला लॉजिस्टिक हब बनवणार
भिवंडी : ऐतिहासिक परंपरा असलेल्या भिवंडी शहरात ११ तलाव होते. त्यापैकी फक्त पाच शिल्लक राहिले आहेत. या शहराच्या विकासाची मानसिकता येथील महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची नाही, ती फक्त भाजपमध्ये आहे. भिवंडी हे व्यापार दृष्टीने महत्त्वाचे शहर बनणार असून, येथील लॉजिस्टिक हबला सर्व सुविधा व रस्त्यांची कनेक्टिव्हिटी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. मनपा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विजय संकल्प सभा संपन्न झाली.
विलासरावांबद्दल आदर; मुख्यमंत्र्यांचे डॅमेज कंट्रोल
लातूर : काँग्रेसच्या ७० वर्षांच्या दुर्लक्षामुळे शहरांचे बकालीकरण झाले. परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर शहरांचा विकास साधल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भाने डॅमेज कंट्रोल करीत मुख्यमंत्र्यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचा पुनरुच्चार केला.