‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:46 IST2026-01-05T14:45:31+5:302026-01-05T14:46:07+5:30
Municipal Election 2026: भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’चे वगनाट्य जोरात सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
मुंबई - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला गेला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून, पैशाचा खेळ सुरू आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरू असून, भाजपामहायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’चे वगनाट्य जोरात सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, निवडणुका या काही नवीन नाहीत, निकोप लोकशाहीत विरोधी पक्षांनाही तेवढेच महत्व आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात सहा बिगर काँग्रेसचे मंत्री होते, ही आपली संस्कृती व परंपरा आहे पण विरोधकच नको अशी प्रवृत्ती भाजपा व महायुतीची बनली असून त्यातून बिनविरोधसाठी सत्ताधारी कोणत्याही स्तराला जात आहेत.
विरोधी पक्षांच्या उमेदवाराला अर्ज भरू न देणे, धमक्या देणे, दबाव तंत्राचा वापर करणे त्याचबरोबर पोलीस, प्रशासन यांच्या मदतीने बेशरमपणाचा खेळ सुरु आहे आणि निवडणूक आयोग मात्र याचा मूक साक्षिदार बनला आहे, याचा आम्ही निषेध करतो. लोकशाहीत संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ‘नोटा’चा पर्यायही आहे, बिनविरोधच्या ठिकाणी मतदारांना ‘नोटा’ वापरण्याची संधी द्यावी, असेही सपकाळ म्हणाले.
दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेतील तीन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले असून तेच एकमेकांवर टीका करत आहेत, हा प्रकार ‘मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर’, असा असून महायुतीत ‘नुरा कुस्ती’ सुरु आहे. एवढेच गंभीर आहेत तर अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे नाहीतर भाजपाने अजित पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.