मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही दरवेळचीच घीसीपीटी कॅसेट, एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:29 IST2026-01-06T14:26:46+5:302026-01-06T14:29:29+5:30
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शिंदेसेना आणि एकनाथ शिंदे ठाण्यापुरते आहेत असे म्हणायचे; पण..

मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही दरवेळचीच घीसीपीटी कॅसेट, एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
बामणोली : ‘मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, हेच विरोधकांनी पाहिलं. तर आम्ही मुंबईचा विकास पाहतो. मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही दरवेळचीच घीसीपीटी कॅसेट आहे. आम्हाला महाराष्ट्र फास्ट तर मुंबई सुपरफास्ट करायची आहे. आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो,’ अशा जोरदार टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
दरे, ता. महाबळेश्वर या आपल्या गावी आल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, ‘मुंबईचा सर्व विकास महायुती सरकारने केला. मुंबईची जनता सुज्ञ असून, कामाला महत्त्व देणारी आहे. भावनेचं राजकारण नको. लोकांना विकासाचा राजकारण पाहिजे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शिंदेसेना आणि एकनाथ शिंदे ठाण्यापुरते आहेत असे म्हणायचे; पण आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी ते चांदा ते बांदापर्यंत आहेत, हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे हे राज्यात फिरले नाहीत. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. म्हणून त्यांची परिस्थिती काय झाली ते आपण पाहिलंय. मला त्यांच्यावर बोलायचं नाही मी कामाने उत्तर देत असतो.
नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत आम्ही मैत्रिपूर्ण लढत आहोत. तिथे शिंदेसेनेची मोठी ताकद आहे. या ठिकाणी शिंदेसेनेला मोठे यश मिळेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कामाच्या जोरावर महायुतीचाच झेंडा फडकेल. महायुतीचाच महापौर होणार आहे, असा दावाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
उत्तेश्वराची मध्यरात्री पूजा अन् आरती...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रद्धास्थान असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील उत्तेश्वराच्या चरणी लीन झाले. यासाठी पायी डोंगर चढून यात्रेत सहभागी झाले. मध्यरात्री एक वाजता त्यांच्या हस्ते पूजा, अभिषेक आणि आरती कार्यक्रम पार पडले. यावेळी मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे, सुभाष कारंडे, संजय मोरे, अजित सपकाळ, सचिन कदम, गणेश उतेकर, संपत उतेकर, नीलेश मोरे, रुपेश सपकाळ, विजय शिंदे, मिलिंद शिंदे आदी उपस्थित होते.
यादरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींची संख्या अधिक आहे. अनेकांनी योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला; पण, तुमचा भाऊ एकनाथ शिंदे यांच्यामुळे ही योजना बंद झाली नाही आणि कधी बंदही होणार नाही. दुर्गम कोयना, कांदाटी परिसराचा विकास करायचा आहे. उत्तेश्वर मंदिराचे काम लवकरच पूर्ण करू. येथील भक्त निवास आणि इतर कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी एक अधिकारी नेमला जाईल. तापोळ्यातील केबल स्टे ब्रिज मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट केले.