एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता : शंभूराज देसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:30 IST2026-01-05T17:28:53+5:302026-01-05T17:30:44+5:30
मित्रपक्षाकडून आमची ताकद तोलताना गल्लत

एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता : शंभूराज देसाई
सांगली : राज्यात महायुतीची सत्ता आली आहे, त्यामागे खरे कारण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय, अडीच वर्षांत केलेली कामे हेच आहे. लाडकी बहीण योजना, महिलांना एसटी प्रवासात सवलत आणि विकासकामे यामुळे सत्ता मिळाली आहे, हे लक्षात ठेवा. महापालिका निवडणुकीत मित्रपक्षाने ऐनवेळी का निर्णय बदलला समजलेच नाही. आमची ताकद तोलताना, मापताना त्यांनी मोठी गल्लत केली आहे. आमची ताकद त्यांनी कमी मोजली, अशी टीका भाजपचा उल्लेख न करता पर्यटनमंत्री तथा शिंदेसेनेचे संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे केली.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या प्रचाराचा प्रारंभ रविवारी विश्रामबाग येथील गणपती मंदिरासमोर झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुहास बाबर, जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, संजय विभुते, जिल्हा संघटक गौरव नायकवडी, रावसाहेब घेवारे, सचिन कांबळे, सुनीता मोरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री देसाई म्हणाले, महापालिका निवडणुकीत युती करावी म्हणून आग्रह झाला. त्यामुळे आम्ही चर्चा सुरू केली. चर्चा पुढे गेली, जागावाटपाबाबत चर्चा झाली. परंतु, ऐनवेळी काय झाले समजले नाही. एकाएकी मित्रपक्षाने बदल केला. आम्हाला ते लक्षात आले. त्यांनी आमची ताकद तोलताना, मापताना नक्कीच गल्लत केली. आमची ताकद कमी मोजल्याने स्वबळावर निवडणुका लढविण्याचे ठरविले. आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षांच्या हातात तुम्ही सत्ता देऊन कारभार बघितला आहे. आता आमच्या हातात सत्तेचा वाटा द्या.