Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 06:54 IST2024-11-24T06:52:47+5:302024-11-24T06:54:11+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: बंडखोरांनाही दाखविले गेले आस्मान, माजी खासदारांसह सर्वच बंडखोरांची सद्दी मतदारांनी संपविली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभव पहावा लागला

Key Highlights of Maharashtra Vidhan Sabha Election 2024
किरण अग्रवाल
जळगाव - उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे जिल्ह्यात महायुतीला ‘शत-प्रतिशत’ जागा देतानाच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात उद्धवसेनेला साफ नाकारले गेल्याने विभागात ‘महायुती’ने लक्षणीय वर्चस्व स्थापित केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर अशा दोनच जागा काँग्रेसला तर कर्जत जामखेडची एकमात्र जागा शरद पवार गटाला लाभली आहे.
यावेळचा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये निकराचा सामना झाला. त्यात मोठ्या प्रमाणातील बंडखोर व अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती व्यक्त होत होती; पण समीर भुजबळ, हिना गावित व ए.टी. पाटील अशा तिघा माजी खासदारांसह सर्वच बंडखोरांची सद्दी मतदारांनी संपविली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभव पहावा लागला असून, जळगाव जिल्ह्यातील रावेर व धुळे ग्रामीणची जागाही काँग्रेसच्या हातून गेल्याने जळगाव, धुळे व नाशिक हे तीन जिल्हे काँग्रेसमुक्त झाले आहेत.
‘एमआयएम’ने गेल्यावेळी मालेगाव मध्यसह धुळे शहर मतदारसंघातील जागा काबीज केली होती; पण यंदा ‘एक है तो सेफ है’च्या नाऱ्यामुळे धुळे शहराची जागा भाजपने विक्रमी मताधिक्याने खेचून घेतली आहे. उद्धवसेनेला अपयश आले असताना शिंदेसेनेने अन्य जागा राखताना धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्येही एक-एक जागा मिळवून खाते उघडले आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, गिरीश महाजन यांना ‘जरांगे फॅक्टर’चा कथित अडथळा न होता विकासावर मतदारांनी मोहोर उमटविली आहे.
पाच मुद्द्यांत विश्लेषण
महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांची एकसंधता व लाडक्या बहिणींचे आशीर्वाद कामी आले.
लोकसभेसाठीच्या राज्यातील निकालापासून धडा घेऊन भाजपने केलेले ‘मायक्रो प्लॅनिंग’ उपयोगी पडले.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकजिनसीपणे प्रचारात न दिसल्याचा फटका.
कांद्याचा प्रश्न मिटला; पण कापूस, सोयाबीन, दूध दराच्या मुद्द्यावर आघाडीला रान पेटवता आले नाही.
विभागात जाहीर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महाआघाडीला ‘टेम्पो’ राखता आला नाही.