Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 11:43 AM2024-11-29T11:43:38+5:302024-11-29T11:47:39+5:30
Mahayuti Maharashtra News: निकालानंतर महायुतीच्या सध्या जोर बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदाबरोबरच सत्ता वाटपाच्या वाटाघाटीही सुरू आहेत.
Eknath Shinde Maharashtra: महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष सध्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार, याकडे लागले आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला असणार असून, भाजपला राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीत एकजूट असल्याचा मेसेज देण्यासाठी भाजपकडून हा आग्रह केला जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने राजकीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतरही मुख्यमंत्री कोण आणि सत्तेच्या वाटाघाटीचा तिढा सुटलेला नाही.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्यास सांगितले होते. आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार उपमुख्यमंत्री असणार, हे निश्चित असून, एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं, यासाठी भाजप आग्रही आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये राहिले, तर महायुती एकसंध असल्याची मेसेज जनतेमध्ये जाईल, अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळेच त्यांना आग्रह केला जात आहे.
एकनाथ शिंदेंकडून नकार
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील होण्यास तयार नाहीत. त्यांच्याऐवजी नवीन व्यक्तीला सामील करण्याचा प्रयत्न आहे. श्रीकांत शिंदे यांच्या नावाचीही या पदासाठी चर्चा सुरू आहे.
राजकीय सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री होणं, हा मुद्दा नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी उदाहरणे आहेत. देवेंद्र फडणवीसांसह अनेक वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री राहिले आहेत. पण, दोन मराठा उपमुख्यमंत्री असणे, हा मेसेज मतदारांपर्यंत नकारात्मक जाण्याची भीती आहे.
"ही मोठी गोष्ट आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेण्याची शक्यता नाही, असे मला वाटते. ते मंत्री होतील आणि राज्याच्या सरकारमध्येच राहतील", असे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट या चर्चेवर बोलताना म्हणाले.