Maharashtra Government Video: 'उद्धवसाहेब, राज्यात महायुतीचंच सरकार यावं', शिवसैनिकाचं टॉवरवरून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:15 IST2019-11-13T14:13:51+5:302019-11-13T14:15:05+5:30
Maharashtra Government: नंदुरबार तालुक्यातील कारली गावातील शिवसैनिकांने मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले.

Maharashtra Government Video: 'उद्धवसाहेब, राज्यात महायुतीचंच सरकार यावं', शिवसैनिकाचं टॉवरवरून आंदोलन
नंदुरबार - राज्यातील राजकीय परिस्थिती एकदम बदलली असून महायुतीत फूट पडली असून महाआघाडीची ताकद वाढली आहे. शिवसेनेने महाआघाडीला सोबत घेऊन महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करायचा चंग बांधला आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाशिवआघाडीकडून सरकार स्थापनेचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक स्थानिक ठिकाणची गणिते बिघडली आहेत. काही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाला विरोधही दर्शवला आहे.
नंदुरबार तालुक्यातील कारली गावातील शिवसैनिकांने मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन व्हावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी या शिवसैनिकास टॉवरवरुन खाली उतरविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तुकाराम भिका पाटील असं या शेतकरी शिवसैनिकाचं नाव असून 2003 ते 2013 पर्यंत आपण कारली गावतील शिवसेनेचा शाखाप्रमुख राहिल्याचं पाटील यांनी म्हटलंय. आम्हाला आघाडीच सरकारचे घोटाळे नकोत, यापूर्वी खूप भोगलंय. महाराष्ट्राने युतीला भरभरून प्रेम दिलंय, त्यास लाथाडू नका हा जनादेशाचा अपमान आहे, असे या पत्रात शिवसैनिक पाटील यांनी म्हटलंय. भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र येत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बनवावं, अशी अपेक्षा या आंदोलक शिवसैनिकाने व्यक्त केली आहे. त्यासाठी, थेट मोबाईल टॉवरच्या टोकाला जाऊन आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आंदोलक शिवसैनिकाला खाली उतरवले आहे.
शिवसैनिकाचं मोबाईल टाॅवरवर चढून अनोखं आंदोलन pic.twitter.com/AL0G9W1Xud
— Lokmat (@MiLOKMAT) November 13, 2019