Maharashtra election 2019 : वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढायला मागेपुढे पाहणार नाही : शरद पवारांनी विरोधकांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 17:06 IST2019-10-19T17:06:39+5:302019-10-19T17:06:45+5:30
Maharashtra election 2019 : त्यांना सांगा जोपर्यंत ते सरळ आहे तोपर्यंत मी सरळ आहे..

Maharashtra election 2019 : वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढायला मागेपुढे पाहणार नाही : शरद पवारांनी विरोधकांना सुनावले
बारामती : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला जातो, असं माझ्या कानावर आलंय. त्यांना सांगा जोपर्यंत ते सरळ आहेत तोपर्यंत मी सरळ आहे. त्यांनी वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढायला मागपुढं पाहणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले.
इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या सांगता सभेमध्ये शनिवारी (दि. १९) पवार बोलत होते. यावेळी माजीमंत्री व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना लक्ष करीत पवार म्हणाले, माझी चर्चा दत्तात्रय भरणे यांच्याशी झाली होती. मतदार संघात वाद नको म्हणून ते थांबायला तयार होते. ही चर्चा झाल्यानंतर मी हर्षवर्धन पाटील यांना आठवेळा फोन केला मात्र त्यांनी घेतला नाही. शेवटी त्यांच्या कन्येशी संपर्क करून झालेली चर्चा हर्षवर्धन यांच्या कानावर घाला, असे सांगितले मात्र त्यांचे उत्तर आले नाही. आमच्यावर अन्याय झाला असे सांगत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जे घराणं काँग्रेसच्या विचाराशी प्रामाणिक राहिले. काँग्रेसच्या तत्त्वांनी स्वर्गिय शंकरराव पाटील यांनी राजकारण केले. मात्र तत्व कधी सोडले नाही. त्या शंकरराव भाऊंना वर काय वाटत असले, अशा शब्दात पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टिका केली. शेवटी पवार म्हणाले, २० वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळात तालुक्यात विकासकामे केली असती तर हर्षवर्धन यांच्यावर ही वेळ आली नसती. दत्तामामांनी पाच वर्षात १३०० कोटींचा निधी मतदार संघामध्ये आणून आपण कामाचा माणूस आहोत हे दाखवले आहे.
———————————