महाराष्ट्र निवडणूक 2019: १ लाख मताधिक्याची केली होती गर्जना, पण 'एकीच्या बळा'ने तंगवलं चंद्रकांतदादाना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 18:35 IST2019-10-24T18:34:59+5:302019-10-24T18:35:57+5:30
कोथरुड विधानसभा निवडणूक २०१९: कोथरुड विधानसभेची निवडणूक चुरशीची होती. भाजपाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती

महाराष्ट्र निवडणूक 2019: १ लाख मताधिक्याची केली होती गर्जना, पण 'एकीच्या बळा'ने तंगवलं चंद्रकांतदादाना!
मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झालेले आहेत. भाजपा-शिवसेना महायुतीच्या पारड्यात जनतेने १५८ जागा टाकल्या आहेत तर महाआघाडी ९९ जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मनसेने सबळ विरोधी पक्षासाठी मतदान करावं असं आवाहन केलं होतं. मात्र जनतेने अवघी १ जागा मनसेच्या खात्यात दिली. मात्र कोथरुडमध्ये मनसेने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घाम फोडला.
कोथरुड विधानसभेची निवडणूक चुरशीची होती. भाजपाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुरुवातीला चंद्रकांत पाटील यांना विरोध होताना दिसत होता. मात्र कालांतराने चंद्रकांत पाटील यांना विविध संघटनांकडून होणारा विरोध मावळला. कोथरुडमध्ये स्थानिक आणि बाहेरचा असा प्रचार करण्यात आला. तसेच विरोधकांकडून मनसेला साथ देत या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मनसेचे किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली.
या मतदारसंघात मनसे आणि भाजपा या मतदारसंघात थेट लढत होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं होतं. या मतदारसंघात भाजपाने १ लाख मताधिक्याने निवडून येण्याचा दावा केला होता. मात्र मनसेचे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांनी अनपेक्षित लढत देऊन ८० हजार मते मिळवत चंद्रकांत पाटील यांची दमछाक केली. चंद्रकांत पाटील यांना १ लाख ४ हजार मते मिळाली. त्यामुळे २४ हजारांहून जास्त मताधिक्याने निवडून येता आलं.
महत्वाच्या बातम्या
अब की बार, मंत्र्यांच्या पराभवाचा षटकार; चुरशीच्या लढाईत हरले 'टीम देवेंद्र'चे अर्धा डझन शिलेदार
भाजपाला 'त्या' १५ आमदारांचंही बळ?... धक्का देणारेच संपर्कात; मुख्यमंत्र्यांचा दावा