Maharashtra Election 2019: 'मोदीजींच्या राज्यात शेतकरी चिंतेत अन् उद्योगपती मजेत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 16:28 IST2019-10-13T16:27:50+5:302019-10-13T16:28:51+5:30
राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Election 2019: 'मोदीजींच्या राज्यात शेतकरी चिंतेत अन् उद्योगपती मजेत'
लातूर: मोदींच्या राज्यात शेतकरी चिंतेत आहे. बँकांचं कर्ज कसं फेडायचं याची चिंता त्याला सतावत आहे. मात्र मोदींचे मित्र असलेले उद्योगपती मजेत आहेत. कर्ज बुडवलं तरी आपण परदेशात पळून जाऊ शकतो, असा ठाम विश्वास त्यांच्या मनात आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवरुन लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीच कलम 370चा उल्लेख केला जात असल्याचंदेखील ते म्हणाले. लातूरमधील औसामध्ये ते पक्षाच्या प्रचारसभेत बोलत होते.
तुमची कर्जमाफी झाली का? पिकाला चांगला भाव मिळतोय का? अच्छे दिन आले का?, असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले. मोदींनी त्यांच्या उद्योगपती मित्रांचं साडे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. अंबानी, अदानी यांनी घेतलेलं कर्ज माफ करून टाकलं. मोदींनी त्यांच्या मित्रांना दिवाळी गिफ्ट दिलं. पण सर्वसामान्य शेतकऱ्याला काय मिळालं?, असा प्रश्न राहुल यांनी विचारला.
देशाची अर्थव्यवस्था संकटात आहेत. नव्या नोकऱ्या सोडाच. असलेल्या नोकऱ्या जात आहेत. मात्र मोदी यावर चकार शब्द काढत नाहीत, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी पंतप्रधानांवर शाब्दिक हल्ला चढवला. मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली. पण भारतातील उद्योगांची स्थिती बिकट आहे. कारखाने बंद होत आहेत. सर्व वस्तू चीनवरुन आयात होत आहेत. मोदींच्या मेक इन इंडियाचं आता मेड इन चायना झालं आहे, असंदेखील राहुल गांधी म्हणाले.