श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 17:11 IST2024-12-01T17:06:23+5:302024-12-01T17:11:31+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एक बैठक अमित शाहांसोबत झाली होती, आता आमची तिघांची बैठक होईल. यातून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 result eknath shinde clear about will the mp shrikant shinde likely get the post of deputy chief minister | श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण

श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे गावी पत्रकारांना संबोधित करताना विविध मुद्द्यांवर स्पष्ट मत व्यक्त केले.

एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली. दरे येथील त्यांच्या बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे यांनी घरीच आराम करणे पसंत केले. यानंतर आता एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी असून, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपा जो निर्णय घेईल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल

पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एक बैठक अमित शाहांसोबत झाली होती, आता आमची तिघांची बैठक होईल. यातून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. राज्याने आम्हाला खूप दिले आहे. राज्यात लवकर चांगले सरकार स्थापन व्हावे, अशी जनतेची इच्छा आहे. लोक काय बोलतात, विरोधक काय बोलतात, ह्याच्याशी आम्हाला घेणे-देणे नाही. महायुतीत कुठलाही समन्वयाचा अभाव नाही. मला माझी भूमिका परत परत मांडण्याची गरज नाही. मी यापूर्वीच सांगितले की, भाजपा जो निर्णय घेईल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली, हे खरे आहे का?  श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, चर्चा सुरू आहेत आणि या चर्चेतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे, लोकांना जी आश्वासने आम्ही दिली आहेत, ती आम्हाला पूर्ण करायची आहेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने लोकांशी आम्ही बांधील आहोत आणि ती बांधीलकी जपायची आहे. मला काय मिळाले, कोणाला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे, हे महत्त्वाचे आहे. जनतेने आम्हाला भरभरुन दिले आहे, आमच्यावर मतांचा वर्षाव केला आहे, आता आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या होत्या. आम्हाला जनतेने यश प्रचंड मिळवून दिले. मी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला माझा आणि शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल. आमच्या मनात किंतू-परंतू नाही आणि इतर कुणाच्याही मनात नसावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 result eknath shinde clear about will the mp shrikant shinde likely get the post of deputy chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.