Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 16:04 IST2024-11-19T16:03:06+5:302024-11-19T16:04:21+5:30
Hitendra Thakur, Vinod Tawde News latest Update: विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला होता. तर हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंची डायरी दाखवत त्यात १५ कोटी रुपये वाटल्याचा उल्लेख असल्याचे म्हटले होते.

Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
नालासोपारामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसे वाटप करत असल्याच्या आरोपातून बविआच्या नेत्यांनी पकडले होते. यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. भाजपाच्या नेत्यांनीच तावडे पैसे वाटत असल्याचे आपल्यासा सांगितल्याचा गौप्यस्फोट हिंतेंद्र ठाकूर यांनी केला आहे. तर तावडे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदानाच्या दिवशी काय करायचे हे सांगण्यासाठी आलो होतो असे सांगत आहेत. अशातच तावडेंकडे किती पैसे सापडले याची माहिती पोलीस, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तावडे पाच कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला होता. तर हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंची डायरी दाखवत त्यात १५ कोटी रुपये वाटल्याचा उल्लेख असल्याचे म्हटले होते. निवडणूक आयोगाच्या पथकाला ठाकूर समर्थकांनी तावडेंकडे सापडलेले पैसे दिले, त्याचा आकडा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.
रुममध्ये एफएसटी टीमने केलेल्या तपासणीत ९,९३,५०० एवढी रक्कम सापडली आहे. याठिकाणी जी अनधिकृत पत्रकार परिषद झाली त्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर जे काही इथे अनधिकृत पैसे आढळून आले आहेत त्याविरोधात १७३ बीएनएस व इतर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलीस अधिकारी पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.
याचबरोबर नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक आणि चौधरी यांना काही मारहाण झालेली नाही, इथे पोलिसांना परिस्थिती व्यवस्थित हाताळली आहे, असे चौगुले म्हणाल्या आहेत.