शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:21 IST2024-11-25T16:20:12+5:302024-11-25T16:21:37+5:30
Sharad pawar, Uddhav Thackeray Politics: भाजपाला १३२ जागा मिळाल्याने काहीही झाले तरी पाच वर्षे सरकार स्थिर चालणार आहे हे नक्की आहे. आता याच जोरावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे धाडस महायुती करण्याची शक्यता आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
विधानसभा निवडणुकीत मविआला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एवढा की विरोधी पक्षनेते पदावरही ही आघाडी दावा करू शकणार नाही. उद्धव ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार राष्ट्रवादी १० अशा जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांना ४१ आणि एकनाथ शिंदेंना ५७ जागा मिळाल्याने ठाकरे आणि थोरल्या पवारांचे राजकारण संपल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेने दिल्याचे बोलले जात आहे. अशातच उद्धव ठाकरेंना व शरद पवारांना आणखी एक संधी मिळणार आहे.
भाजपाला १३२ जागा मिळाल्याने काहीही झाले तरी पाच वर्षे सरकार स्थिर चालणार आहे हे नक्की आहे. आता याच जोरावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे धाडस महायुती करण्याची शक्यता आहे. अगदी मुंबई, पुणे महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर गेलेल्या आहेत. त्या देखील येणाऱ्या काळात घेतल्या जाणार आहेत.
यामुळे उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाची खरी लढाई मुंबई महापालिकेत असणार आहे. ठाकरेंनी मुंबईत ३० जागा लढविल्या होत्या. त्यापैकी केवळ ९ जागाच जिंकल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईत ७ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाने १५ जागा जिंकून मुंबईत महायुतीचेच वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महायुतीने मुंबईतील ३६ जागांपैकी २२ आणि मविआने १४ जागा जिंकल्या आहेत.
२०१७ ला झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा बहुमतापासून थोडक्यात हुकली होती. आताचे बळ पाहता मुंबई महापालिकेतील शिवसेनेची ३० वर्षांची सत्ता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना कोणाची हे जवळजवळ स्पष्ट झालेले असले तरी उद्धव ठाकरेंना आणखी एक संधी मिळणार आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्या पारड्यात मतदारांनी राष्ट्रवादी कोणाचीचे मत देऊन टाकले आहे. अशातच शरद पवारांनी आता राज्यसभेचे दीड वर्ष संपले की आपण राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. ते त्यांना भोवले आणि मतदार भविष्य असलेल्या अजित पवारांकडे गेले. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर शरद पवारांकडेही एक संधी राहणार आहे.