"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 17:14 IST2024-11-30T17:00:14+5:302024-11-30T17:14:41+5:30
पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
Ajit Pawar : महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावरून गोंधळ सुरूच आहे. प्रचंड बहुमताने विजय मिळवल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन मंथन सुरूच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जात असला तरी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. अशातच राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. तर राहिलेल्या दोन पक्षांबाबतही अजित पवार यांनी भाष्य केलं. त्यामुळे आता मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद स्विकारणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अद्यापही राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर न झाल्याने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या नावाच्या घोषणा झालेली नाही. अशातच अजित पवार यांनी मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचे जाहीर केलं आहे.
पुण्यात बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला भेट दिल्यानंतर अजित पवार बोलत होते. "सध्या प्रचंड बहुमताचे महायुतीचे सरकार स्थापन करुन जे काही आम्ही पाच वर्षांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं याला आम्ही प्राधान्यक्रम देणार आहोत. भाजपचा मुख्यमंत्री होईल हा निर्णय झाला आहे. उरलेल्या दोन पक्षांचे दोन उपमुख्यमंत्री होतील हा निर्णय देखील झाला आहे," असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शपथविधीची तारीख सांगितली आहे. ५ तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होणार आहे. जो निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर होईल, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.
शिवसेना गृहखात्यासाठी आग्रही
दरम्यान, भाजपकडून त्यांचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे व अजित पवारांनी शर्यतीतून माघार घेतली होती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुती सरकारमध्ये जास्तीत जास्त मंत्रिपदं व गृहमंत्रीपद मिळावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशातच शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटलं आहे. "मुख्यमंत्र्यांच्या नावावरील सस्पेंस लवकरच संपणार आहे. येत्या २४ तासांत हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार आहेत. एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतात तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी जातात. त्यामुळे ते काही मोठा निर्णय घेतील," असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
"आधीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते व त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देखील होतं. आता भाजपाकडे मुख्यमंत्रीपद असणार आहे व शिवसेनेकडे नैसर्गिकरित्या उपमुख्यमंत्रीपद येणार असेल तर त्याबरोबर गृहमंत्रीपदही मिळायला हवं, असंही शिरसाट यांनी म्हटलं.