"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 22:53 IST2024-09-29T22:52:25+5:302024-09-29T22:53:02+5:30
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नारपूरमधील कळमेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राज्यातील महायुती सरकार, भाजपा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली.

"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नारपूरमधील कळमेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राज्यातील महायुती सरकार, भाजपा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच राज्यातील हे सरकार कोणत्याही परिस्थितीत उलथून टाकायचंच, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच संघाने पोसलेल्या रोपट्याला दाढीवाला डिंक्या आणि गुलाबी अळी लागलीय, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपा, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टोला लगावला.
राज्यातील महायुतीचं सरकार उलथून टाकण्याचा निर्धार करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला येथे नुसता विजय नको आहे तर दणदणीत विजय हवा आहे. सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेन. मी मुख्यमंत्री असताना उद्योग गुजरातला गेल्याची एकही बातमी येत नव्हती. विधानसभेची निवडणूक ही सत्तेची लढाई नाही तर महाराष्ट्राची लूट थांबवण्याची लढाई आहे. जो महाराष्ट्र प्रेमी असेल तोर महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राजकारणातून संपवण्याच्या केलेल्या विधानावरूनही उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अमित शाह आम्हाला संपवण्यासाठी येणार आहेत. आम्हाला केवळ जनता संपवू शकते. जनतेनं सांगितलं की, उद्धव ठाकरे घरी बस, तर मी घरी बसेन. मात्र हे मला दिल्लीवरून घरी बसायला सांगत असतील तर जनताच त्यांना घरी बसवेल. हा लढा माझा नाही किंवा शरद पवार यांचा नाही तर आपणा सर्वांचा आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
सध्या महायुती सरकारकडून गाजावाजा करण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, हे सध्या लाडक्या बहिणींना १५०० रुपये देत आहेत. मात्र १५०० रुपयांत काय होतं. महिलांच्या मुलांचं शाळेतील अॅडमिशन तरी होतं का? लाकड्या बहिणीचे पैसे तुमच्या खिशामधून देत आहात का? हे पैसे जनतेचे आहेत. मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. पण स्टेज टाकून कार्यक्रम केले नाहीत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.