"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:17 IST2024-11-25T15:16:25+5:302024-11-25T15:17:48+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुतीमधील तिन्ही प्रमुख घटकपक्षांच्या नेत्यांकडून आपापल्या नेत्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं जात आहे.

"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुतीमधील तिन्ही प्रमुख घटकपक्षांच्या नेत्यांकडून आपापल्या नेत्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं जात आहे. एकीकडे विद्ममान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपद द्याव यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आग्रही भूमिका घेतली आहे. तर सर्वाधिक जागा निवडून आल्याने भाजपाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आग्रही आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आता मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादांचं नाव पुढे केलं जात आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, अशी मागणी आमदार नरहरी झिरवाळ यांनी केली आहे.
याबाबत आपलं मत मांडताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही माझी अपेक्षा, माझी इच्छा तर आहेच, सोबतच ती जनतेचीही इच्छा आहे. पण याबाबत महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य कारावा लागेल. पण अजित पवार यांना एकदा मुख्यमंत्री करावं, अशी माझी इच्छा आहे, असे नरहरी झिरवाळ म्हणाले.
यावेळी नरहरी झिरवाळ यांनी आपल्याला मंत्रिपद मिळावं अशीही इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, मंत्रालयात मी रोज जातो. पण तिथे स्वत:चं असं काही असावं, मंत्रिपद मिळावं, अशी माझी इच्छा आहे. कुठल्याही खात्याच मंत्री केलं तरी मला चालेल. पण करावं अशी विनंती आहे.
तसेच भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याबाबतही नरहरी झिरवाळ यांनी सूचक विधान केलं. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, राजकारणात काहीही होऊ शकतं. काकांचा पक्ष हा पुतण्याच्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतो. त्यामध्ये वावगं असं काहीच नाही, असेही नरहरी झिरवाळ म्हणाले.