अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 19:50 IST2024-11-15T19:42:15+5:302024-11-15T19:50:30+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे ते कटेंगे या घोषणेला होत असलेल्या विरोधावरुन आता भाष्य केलं आहे.

अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरलेले असतानच महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद सातत्याने वाढत आहेत. मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून नवाब मलिक यांना भाजपच्या नेत्यांनी विरोध करूनही तिकीट दिल्याने,'बटेंगे ते कटेंगे' या घोषणेला विरोध केल्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेपासून झिशान सिद्दीकी यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांनी अंतर ठेवल्याने हे उघडपणे समोर आले. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे ते कटेंगे या घोषणेला होत असलेल्या विरोधावरुन आता भाष्य केलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वादग्रस्त 'बटेंगे ते कटेंगे' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेचे समर्थन केले आहे. महाराष्ट्रात भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बटेंगे ते कटेंगेचा जोरदार प्रतिकार होत असताना फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाण यांसारख्या नेत्यांनीही योगी आदित्यनाथ यांची घोषणा चुकीची असल्याचे म्हटलं होतं.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधावर भाष्य केलं आहे. "अजित पवार, अशोक चव्हाण वेगळ्या विचारसरणीतून आलेले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे ते काटेंगे' या घोषणेमागील सखोल अर्थ त्यांना समजू शकला नाही. आम्ही त्यांना समजण्यास मदत करू," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
"मी पंकजा मुंडे यांच्याशी बोललो आणि त्या म्हणाल्या की भाजप फुटीच्या घोषणांवर नाही तर केलेल्या कामाच्या जोरावर काम करेल. त्यामुळे त्या दोन मनाच्या आहेत असे नाही," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीशी मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे जाहीरपणे मान्य केले. एका मुलाखतीत फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, "नवाब मलिक यांचे काम आम्ही करणार नाही यावरून अजित पवार यांच्याशी शंभर टक्के मतभेद आहेत. आम्ही म्हणालो होतो नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका. तिथे शिवसेनेला तिकीट दिले आहे आणि त्यासाठी काम करत आहोत."