आताच तपासून घ्या मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही?; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 09:17 AM2024-04-21T09:17:10+5:302024-04-21T09:17:58+5:30

पहिल्या टप्प्यातील अनेक तक्रारींनंतर विषय आला ऐरणीवर

Loksabha Election 2024 - Check now whether your name is in the voter list or not?; Know in detail | आताच तपासून घ्या मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही?; जाणून घ्या सविस्तर

आताच तपासून घ्या मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही?; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : आम्ही १५-२० वर्षांपासून मतदान करतोय, पण यावेळी तर आमचे नावच मतदार यादीत नाही, अशा तक्रारी अनेक जणांनी पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या विदर्भातील ५ मतदारसंघांमध्ये केल्या. या पार्श्वभूमीवर मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे कसे तपासावे याबाबत निवडणूक आयोगाने शनिवारी मार्गदर्शन केले आहे. 

मतदारांना voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून किंवा Voter Helpline या ॲपचा वापर करून मतदार यादीत आपले नाव शोधता येते. १) वैयक्तिक तपशिलाच्या पर्यायांतर्गत नाव, आडनाव, वडील किंवा पतीचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाच्या आधारे किंवा २) मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे किंवा ३) मोबाइल क्रमांकाच्या आधारे (तो जर तुमच्या मतदार ओळखपत्राशी जोडला असेल तर) किंवा ४) Voter Helpline App वर मतदार ओळखपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करूनही मतदार यादीत आपले नाव शोधता येते. 

आयाेगाला आले ७३१२ कॉल 
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार राजा उत्सुक असून, विविध माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार सहायता क्रमांकाचा फोन खणाणत आहे.  १८ एप्रिलपर्यंत ७३१२ लोकांनी फोन केला असून, यामध्ये मतदार अर्ज, मतदार कार्डविषयी विविध प्रश्न विचारले जात आहेत. मुंबई उपनगरातून १५७५, ठाणे जिल्ह्यातून ९९१, मुंबई शहरातून ५२०, रायगडमधून १८२ आणि पुण्यातून १६३ फोन आले. 

२२ पर्यंत अर्ज
मतदार यादीत नाव नसेल, तर २२ एप्रिलपर्यंत अर्ज क्रमांक ६ भरावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केले. मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच वयाचा पुरावा, म्हणून पुढीलपैकी  एक दस्तऐवज जोडता येईल - जन्माचा दाखला, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, दहावी, बारावीचे निकालपत्र. 

येथे करा संपर्क 
मतदार यादीत तुमचे नाव कसे पाहायचे याचे मार्गदर्शनपर व्हिडीओ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या CEO Maharashtra या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. निवडणूक प्रक्रियेविषयीच्या शंका निरसनासाठी १८००२२१९५० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मतदार अजूनही होता येईल
उमेदवारी अर्ज भरण्याच्या  दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागविण्यासाठी हा दहा दिवसांचा कालावधी गृहित धरला गेला आहे. 

येथे आहे संधी
पाचव्या टप्प्यात १३ मतदारसंघांमध्ये २० मे रोजी मतदार होईल. तेथे उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३ मे आहे. त्यामुळे येथे अजूनही मतदार म्हणून नोंदणी करता येईल.या मतदारसंघांमध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्यचा समावेश आहे. 

Web Title: Loksabha Election 2024 - Check now whether your name is in the voter list or not?; Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.