Lok Sabha election result 2019: Kapil Patil win in Bhivandi | लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : भिवंडीत पुन्हा कमळ फुलले, कपिल पाटील यांचा दणदणीत विजय

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : भिवंडीत पुन्हा कमळ फुलले, कपिल पाटील यांचा दणदणीत विजय

- मुरलीधर भवार

भिवंडी - गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत भाजपचे कपिल पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीत मोदीलाटेचा करिष्मा चालणार नाही. त्यामुळे त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागणार, अशा वल्गना विरोधकांकडून केल्या जात होत्या. प्रत्यक्षात विकासकामांच्या जोरावर पाटील यांनी पुन्हा एकदा भिवंडीत भाजपचे कमळ फुलवले आहे. पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांचा पराभव करत आपला विजय कायम राखला आहे. निवडणुकीच्या प्रचारातही नियोजन असल्याने कुठेही गोंधळ उडाला नाही. सोशल मीडियावरही जोरदार प्रचार करण्यात आला होता.

पाटील यांची भाजपने सगळ्यात आधी उमेदवारी जाहीर केली. मात्र, या मतदारसंघातून शिवसेनेचे बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेच्या नेत्यांकडून म्हात्रे यांच्यावर दबाव आणत शिवसेनेने म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याने पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. तरीही, बाळ्यामामा पाटील यांच्याविरोधात काम करत टावरे यांना विजयासाठी मदत करणार, अशी चर्चा होती. बाळ्यामामाची मदत टावरे यांच्या उपयोगाला आली नाही. त्याचबरोबर काँग्रेसच्या तिकिटावर २०१४ मध्ये निवडणूक लढवणारे कुणबीसेनेचे विश्वनाथ पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचीही बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आले होते. त्यात सगळ्यात मोठा पुढाकार खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने पाटील यांनी माघार घेतली.

पाटील व टावरे हे आगरी असल्याने आगरी मतांचे विभाजन होईल, असे बोलले गेले. या विभाजनाचा फटका टावरे यांना बसला. पाटील यांच्या पराभवाला हे मतविभाजन रोखू शकले नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण सावंत उच्चशिक्षित व शास्त्रज्ञ आहेत. त्यांना वंचित समाजासह मुस्लिमांची मते मिळतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून केला जात होता. सावंत यांच्या प्रचारासाठी भिवंडीत खुद्द असुद्दीन ओवेसी आले होते. तरीही, मुस्लिम मते वंचितकडे वळली नाहीत.

मुस्लिमबहुल वस्तीतील मतदान हे टावरे यांच्याकडे झुकलेले होते. मात्र, अन्य मतदारसंघात टावरे यांना ज्या पद्धतीने मते मिळायला हवी होती, त्या पद्धतीने मते मिळाली नाहीत. कल्याणमधील मनसेकडून टावरे यांना मताधिक्य मिळवून दिले जाईल, असा दावा केला जात होता. मात्र, तो फोल ठरला.
मुस्लिम मतांनी वंचित आघाडी व समाजवादी पार्टीला पसंती दिली नाही. मुस्लिमांच्या मतांनी टावरे यांना साथ दिली, पण ते विजयश्री खेचून आणू शकले नाहीत.

पाटील यांना मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण पश्चिमेतून चांगले मतदान झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा विजयाची मोहर उमटवली. पाटील यांनी भिवंडी मतदारसंघात २२ हजार कोटींची कामे केली होती. ही कामे प्रत्यक्षात पूर्ण झालेली नसली, तरी काही ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर काही कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा त्यांच्याकडून केला गेला. केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांना मतदारांनी कौल दिला आहे.

भिवंडीतील पॉवरलूमचा प्रश्न व टोरंटोच्या जाचक वीजबिलाचा प्रश्न निवडणुकीची आचारसंहिता संपताच चर्चा करून सोडवला जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत भिवंडीकरांना दिले होते.

पॉवरलूम ही शहराची जान आहे. त्यावर शहराचे अर्थकारण आहे. या दोन्ही समस्या जनहिताच्या असल्याने त्यावर मिळालेल्या आश्वासनापोटी मतदारांनी पुन्हा एकदा पाटील यांना निवडून दिले असल्याचे बोलले जात आहे.

पुढील पाच वर्षांत पाटील यांना भिवंडीतील अपुऱ्या असलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. तसेच मेट्रोसाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे.

अंतर्गत वादाचा टावरे यांना फटका

टावरे हे २००९ मध्ये खासदार होते. पक्षाने २०१४ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यांच्या उमेदवारीविषयी अन्य पक्षाने जो काही संभ्रम निर्माण केला होता, त्याचा फटका टावरे यांना बसला. विशेष म्हणजे टावरे यांनी जोरदार प्रचार केला नाही.

तसेच त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभाही झाल्या नाहीत. काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादामुळे टावरे यांचा पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी या मतदारसंघाकडे लक्ष दिले असते, तर टावरे यांना कदाचित फायदा होऊ शकला असता.

5 कारणे विजयाची

२२ हजार कोटींची विकासकामे मतदारसंघात केली.
केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांचा लाभ मतदारसंघातील लाभार्थ्यांना मिळवून दिला.
कुणबीसेना, श्रमजीवी संघटनेने दिलेल्या पाठिंब्याचा फायदा झाला.
मतदारांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नियोजनबद्ध प्रचार करण्यात आला.

सुरेश टावरे यांच्या पराभवाची ५ कारणे

भिवंडीत काँग्रेसम पक्षामधील गटातटांच्या राजकारणाचा फटका बसला.
तिकीट उशिरा मिळाल्याने नियोजन व जनसंपर्कात कमी पडलो.
मुरबाड व शहापूर येथे १२ महिने काम करूनही अपेक्षित मते मिळाली नाहीत.
लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षाने काँग्रेसचे काम केले नाही.
कल्याण व मुरबाड विधानसभा क्षेत्रांत प्रतिसाद कमी मिळाला.

मित्रपक्षांनीही कामे केली नाहीत.
माझी काम करण्याची पद्धत ज्यांना आवडली, त्यांनी मला मतदान केले. काही उमेदवारांबाबत मला मतदारांकडून तक्रारी आल्या. शहापूर व मुरबाड येथील जनसंपर्कामधून मतमोजणीत आघाडी होती. परंतु, अपेक्षित मते मिळाली नाहीत. तर, भिवंडीत गटातटांच्या राजकारणामुळे ५० टक्के मते मिळत नसतात. त्यामुळे भिवंडी बाहेर मते वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अपेक्षित मते मिळाली नाहीत. काही कार्यकर्त्यांनी कामे केली नाही, हे मतमोजणीतून दिसून आले. ही बाब पराभवास कारणीभूत ठरली आहे. तसेच मित्रपक्षांनीही कामे केलेली नाहीत. मात्र, भिवंडीतील पारंपरिक मतदारांनी मते दिली. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असती, समाधानकारक मते मिळाली असती, तर वेगळा निकाल मिळाला असता.
- सुरेश टावरे, पराभूत उमेदवार, काँग्रेस

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lok Sabha election result 2019: Kapil Patil win in Bhivandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.