सस्पेन्स कायमच ! महायुतीत नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गचा निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 05:27 AM2024-03-29T05:27:20+5:302024-03-29T06:51:57+5:30

Lok Sabha Election 2024 : नाशिकवरून शिंदे गट अन् अजित पवार गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

Lok Sabha Election 2024 : There is no decision of Nashik, Thane, Palghar, Sindhudurg in Mahayuti | सस्पेन्स कायमच ! महायुतीत नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गचा निर्णय नाही

सस्पेन्स कायमच ! महायुतीत नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गचा निर्णय नाही

मुंबई : महाविकास आघाडीत चर्चा सुरू असतानाही उद्धव ठाकरे यांनी सांगली, उत्तर-पश्चिम मुंबईच्या जागेवरील उमेदवार जाहीर करून टाकले होते. मात्र, महायुतीत वादात अडकलेल्या नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, औरंगाबाद, उत्तर- पश्चिम मुंबई या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाचे उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यांनी गुरुवारी जाहीर झालेल्या आठ जागांपैकी सात ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी दिली.

वादग्रस्त जागांना हात न लावण्याचे धोरण शिंदे यांनी अंगीकारल्याचे त्यांच्या पहिल्या यादीवरून दिसते. नाशिकवरून शिंदे गट अन् अजित पवार गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिकचे खा. हेमंत गोडसे उमेदवारीसाठी सातत्याने शिंदेंना भेटत आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी शिंदेंकडे जोर लावला आहे.

औरंगाबादच्या जागेचा आग्रह कायम
औरंगाबादची जागा आपल्याकडे घ्या, असा तेथील नेत्यांचा शिंदेंवर दबाव कायम आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.ठाणे आणि पालघर भाजपला २ हवे आहे, शिंदे या जागा सोडायला तयार नाहीत, असे चित्र आहे. पालघरमध्ये राजेंद्र गावित हे शिंदे गटाचे खासदार आहेत. शिंदे 'ठाणेदार असल्याने अडले आहेत. औरंगाबाद, सिंधुदुर्ग-रत्नागिरी व ठाणे वगळता वादातील अन्य खासदार शिंदे गटाचे आहेत.

उमेदवारी जाधवांना, अर्ज गायकवाडांचा
बुलढाण्याचे शिदे गटाचेच आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली. शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला असला तरी एबी फॉर्म जोडलेला नाही. या मतदारसंघात प्रतापराव जाधव यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. गायकवाड यांचा हा स्टंट असल्याचे म्हटले जाते. सायंकाळी त्यांनी जाधव यांच्याशी बंदद्वार चर्चा केली.

श्रीकांत शिंदे वेटिंगवर 
मुख्यमंत्री शिदे यांचे पुत्र श्रीकांत शिदे यांचे नाव पहिल्या यादीत नाही. कल्याणसह कोकणातील भाजप-शिवसेनेचे जागावाटप अंतिम व्हायचे असल्याने ते वेटिंगवर आहेत. यवतमाळ-वाशिममध्ये भावना गवळी की संजय राठोड की आणखी कोण हा सस्पेन्सही कायम ठेवला आहे.

Web Title: Lok Sabha Election 2024 : There is no decision of Nashik, Thane, Palghar, Sindhudurg in Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.