मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 05:35 PM2024-05-31T17:35:57+5:302024-05-31T17:37:05+5:30

loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून तत्पूर्वी सर्वच उमेदवार आपणच विजयी होणार असा दावा करत आहेत. 

Lok Sabha Election 2024 - All 8 seats of Maha Vikas Aghadi will be elected in Marathwada, claims Chandrakant Khaire, Target on BJP and Eknath Shinde | मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात आठच्या आठ जागा महाविकास आघाडीच्या येणार आहेत असा आमचा रिपोर्ट आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे, जालनात रावसाहेब दानवे हेदेखील पडणार असे संकेत आहेत. त्यांचीच माणसं बोलतायेत. हे दोन्ही नेते पडतील असं भाजपा नेतेच म्हणतायेत असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. 

चंद्रकांत खैरे म्हणाले की, मागील निवडणुकीत रावसाहेब दानवेंनीच मला पाडलं. त्यामुळे परमेश्वर बदला घेतो. राज्यात महाविकास आघाडीला ३२ जागा येतील. अनेकांनी हा अंदाज वर्तवला आहे. महायुतीला ८ ते १० जागा मिळतील. अपक्ष वैगेरे कोण येणार नाही. महायुती, मविआत थेट लढत आहे. एकनाथ शिंदे संपले. सगळे खोके घेऊन गेलेत. लोकांना त्यांच्याबद्दल राग आहे. उद्धव ठाकरेंना सोडून दिले. ज्याने मोठे केले त्यांच्या विरोधात जातात त्यामुळे लोक विरोधात आहेत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच चंद्रकांत खैरे हे धार्मिक आहेत त्यामुळे लोकांना आवडतं. अनेकांनी माझ्या विजयासाठी नवस केला आहे. उद्धव ठाकरेंमागे जे वलय निर्माण झालं त्यातून अधिक बळ मिळालं. हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे. तो कुठे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी काम केले आहे. अनेक मित्र मंडळींनी मदत केली आहे. दारू विकणाऱ्या माणसाला मदत कुणी केली नाही अशा शब्दात चंद्रकांत खैरेंनी नाव न घेता संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला. 

दरम्यान, लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. विरोधी उमेदवार जिंकून येणं कठीण आहे. हे होऊ शकत नाही. छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनीही तुम्ही विजयी होणार असं सांगितले आहे. मी १० हजार काय, ५००० हजार असो पण मी निवडून येणार आहे. मला अनेक जण भेटतात, आम्ही तुम्हालाच मतदान केले. दारु विकणाऱ्या माणसाला कशाला मतदान करायचे? असं महिला बोलत होत्या. दारूबाबतीत लोकांना प्रचंड राग आहे. २५ दुकाने त्याने उघडली आहेत. लोकांची सेवा करायला तुम्ही मंत्रिमंडळात गेला की स्वत:च्या सेवेसाठी हा लोकांना प्रश्न आहे असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.

Web Title: Lok Sabha Election 2024 - All 8 seats of Maha Vikas Aghadi will be elected in Marathwada, claims Chandrakant Khaire, Target on BJP and Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.