Kolhapur North By Election Result: पाटील वि. पाटील! बंटी पाटलांचे चंद्रकांत पाटलांना धक्क्यावर धक्के; कोल्हापुर भाजपमुक्तच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 15:23 IST2022-04-16T15:20:42+5:302022-04-16T15:23:24+5:30
Kolhapur North By Election Result: कोल्हापुरात सतेज पाटलांचा दबदबा; चंद्रकांत पाटलांना स्वत:च्या जिल्ह्यात भाजपचं खातं उघडता येईना

Kolhapur North By Election Result: पाटील वि. पाटील! बंटी पाटलांचे चंद्रकांत पाटलांना धक्क्यावर धक्के; कोल्हापुर भाजपमुक्तच
कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला. देशभरात काँग्रेसची पिछेहाट झाली. मात्र कोल्हापुरात काँग्रेसनं सातत्यानं भाजपला धक्क्यांवर धक्के दिले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे कोल्हापूर भाजपमुक्तच राहिलं. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली. मात्र काँग्रेसच्या सतेज उर्फ बंटी पाटलांनी भाजपला यश मिळू दिलं नाही.
जून २०१९ पासून चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मूळचे कोल्हापूरचे असलेले पाटील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या कोथरुडमधून निवडून आले. चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरात भाजपची पाटी कोरीच राहिली. कोल्हापुरात विधानसभेच्या १० जागा आहेत. भाजपनं राज्यात १०५ जागा जिंकल्या. पण कोल्हापुरात भाजपला भोपळादेखील फोडता आला नाही. काँग्रेस नेते सतेज पाटलांनी ४ जागा निवडून आणल्या.
२०१४ पासून देशात काँग्रेसला उतरती कळा लागली. मात्र कोल्हापुरात वेगळं चित्र दिसलं. सतेज पाटलांनी काँग्रेसला सातत्यानं विजय मिळवून दिले आहेत. पाटलांच्या नेतृत्त्वात काँग्रेस, राष्ट्रवादीनं महापालिका निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये राज्यात भाजप, शिवसेनेची सत्ता होती. जिल्ह्यातले दोन्ही खासदार शिवसेनेचे होते. मात्र तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीचे ६ उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला अवघ्या एका जागांवर यश मिळालं. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. तर एका जागेवर जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे निवडून आले.
२०१५ पासून सतेज पाटील यांचा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा राहिला आहे. राज्यात सत्ता नसतानाही त्यांनी एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकण्याचा सपाटा लावला आहे. कोल्हापूर महापालिका, विधानसभा निवडणुकीत त्यांनी नेतृत्त्वाची चुणूक दाखवून दिली. २०२० मध्ये पुणे शिक्षक आमदार निवडणुकीत त्यांनी प्रा. जयंत आसगावकरांना निवडून आणलं. २०२१ मध्ये कोल्हापूरमधून बंटी पाटील स्वत: विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. त्याच वर्षी गोकुळ दूध संघात त्यांच्या पॅनलनं बाजी मारली. त्यानंतर आता कोल्हापूर पोटनिवडणुकीत त्यांच्याच संघटन कौशल्याच्या बळावर जयश्री जाधवांनी भाजपचं आव्हान परतवून लावलं.