बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 07:00 IST2024-05-11T06:59:39+5:302024-05-11T07:00:30+5:30
बारामती मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारामती मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत बँकेची शाखा सुरू ठेवणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बारामती मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषी आढळल्याने आयोगाने व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
भरारी पथकाची तपासणी
आयोगाच्या भरारी पथकाने यासंदर्भातील तक्रारीनंतर त्याच रात्री बँकेच्या शाखेत जाऊन पाहणी केली असता, बँकेत ४० ते ५० जण असल्याचे आढळले होते.
त्या अनुषंगाने बँकेतील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. त्यात काही लोक शाखा व्यस्थापकाच्या केबिनमध्ये आत-बाहेर करत असल्याचे आढळले.