"हे पहिल्यांदा असं घडलंय की..."; जयंत पाटलांनी सांगितला 2019-2024 निवडणुकीतील ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:14 IST2024-12-08T13:11:12+5:302024-12-08T13:14:33+5:30

Markadwadi News: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे. विरोधकांकडून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी जोर धरत आहे. 

Jayant Patil expressed suspicion that the EVMs are being tampered with and demanded to conduct the election on ballot paper | "हे पहिल्यांदा असं घडलंय की..."; जयंत पाटलांनी सांगितला 2019-2024 निवडणुकीतील ट्रेंड

"हे पहिल्यांदा असं घडलंय की..."; जयंत पाटलांनी सांगितला 2019-2024 निवडणुकीतील ट्रेंड

Sharad Pawar Markadwadi News: विधानभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ईव्हीएम विरोधात विरोधक आंदोलन उभारण्याच्या तयारीत दिसत आहे. मारकडवाडीतील ग्रामस्थांना ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित करत मतपत्रिकेवर मतदान घेण्याची तयारी केली, पण प्रशासनाने त्याला विरोध केला. याच पार्श्वभूमीवर रविवारी (८ डिसेंबर) शरद पवारांच्या उपस्थित मारकडवाडी येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही मुद्दे उपस्थित करत शंका मांडल्या. 

जयंत पाटील म्हणाले, "सोलापुरातील मारकडवाडी हे गाव देशभरातील ईव्हीएम विरोधाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीत मारकडवाडीच्या गावकऱ्यांनी केलेल्या निर्धारास बळ दिले. चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मारकडवाडीची माती अर्पण करून हे आंदोलन आमदार उत्तमराव जानकर यांनी सुरू केले आहे. त्यास प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे."

'मविआला प्रचंड प्रतिसाद, पण निकाल अनपेक्षित लागला'

"हे पहिल्यांदा असं घडलं की, मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तीनदा चारदा आपली आकडेवारी दुरुस्त केली. आणि काही लाख मतं मतदान पेटीत वाढली हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद असल्याचे चित्र होते. मात्र निकाल अनपेक्षित लागले", असे जयंत पाटील म्हणाले. 

पोस्टल मतदानाबद्दल प्रश्न

"पोस्टाने आलेली मते साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेण्ड दाखवते. २०१९ साली पोस्टल मतदानात पुढे असलेल्या पक्षांचे अधिक उमेदवार निवडून आले. मात्र २०२४ मध्ये पोस्टल मतदानाचा ट्रेण्ड त्यांच्यासाठी चढा ठरला. आणि आपल्या तीन पक्षांसाठी उतरता. हा विरोधाभास आहे. म्हणून लोकांच्या मनात शंका आहे", अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली. 

"लाडक्या बहिणींना योजनेतून पैसे मिळाले असतील पण पैसे मिळाले म्हणून महाराष्ट्र विकला जाणार नाही.  हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मोठे धैर्य दाखवले आहे. त्यांनी एक चळवळ उभी केली आहे. त्यामुळे आता इतरही गावं प्रेरित होऊन हा प्रयोग करू पाहत आहे", असे जयंत पाटील म्हणाले. 

माझ्या मतदारसंघातही मते घटली -जयंत पाटील

जयंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील अनुभवही यावेळी सांगितला. ते म्हणाले, "माझ्या मतदारसंघातही काही गावे आहेत, जिथे सर्व पक्ष एकत्रितपणे माझ्यासाठी काम करत असताना देखील मते प्रचंड प्रमाणात घटली. महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणी पहायला मिळाले."

"फ्रीडम ऑफ स्पीच" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकांना दिलेला अधिकार आहे. त्याद्वारे या गावात बॅलेट पेपरवर मतदान व्हावे ही इच्छा लोकांनी व्यक्त केली. मात्र त्यास सरकार का घाबरतेय? यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपर वरच व्हाव्यात ही जनतेचे मागणी आहे", अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.  

"मारकडवाडी येथील लोकांनी दाखवलेले धारिष्ट अभिमानास्पद आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून तुम्हाला पाठिंबा दिला आहे. लोकशाहीचा हा लढा आपण एकत्रितपणे लढू", असे म्हणत ईव्हीएम विरोधात आंदोलन उभे करण्याचे संकेत जयंत पाटलांनी यावेळी दिले. 

Web Title: Jayant Patil expressed suspicion that the EVMs are being tampered with and demanded to conduct the election on ballot paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.