मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:26 IST2026-01-02T19:25:57+5:302026-01-02T19:26:39+5:30
राज्यातील महापालिका निवडणुकीतील मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे

मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
मुंबई - राज्यात २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बंडखोरांची नाराजी दूर करून त्यांची मनधरणी करणे प्रत्येक पक्षासमोर आव्हान होते. त्यात भाजपाने अनेक नाराजांची समजूत काढण्यात यश मिळवले. त्याशिवाय अपक्ष आणि प्रमुख विरोधी पक्षांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यात महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध विजयी झाले. मतदानापूर्वीच विविध महापालिकांमध्ये महायुतीचे ६४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे निवडणुका बिनविरोध करण्यामध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत भाजपाचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत त्यात सर्वाधिक १५ बिनविरोध नगरसेवक एकट्या कल्याण डोंबिवली महापालिकांमध्ये आहे. भाजपानंतर सत्तेतील दुसरा पक्ष शिंदेसेनेचेही १८ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत आणि महायुतीतील तिसरा घटक पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही मतदानापूर्वीच २ ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुकीतील मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे. त्याशिवाय मालेगाव येथे इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
जळगाव महापालिकेत एकूण १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ६ आणि भारतीय जनता पार्टीचे ६ असे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अहिल्यानगर येथे प्रभाग सात ब मधील भाजपा उमेदवार पुष्पा बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पनवेल महापालिकेत अपक्षांसह मविआच्या उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने ७ जागांवर भाजपा बिनविरोध निवडून आली आहे.
कल्याण डोंबिवलीत महायुतीचा बोलबाला
कल्याणमध्ये महायुतीचे एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात भाजपाचे १५ तर शिंदेसेनेचे ६ उमेदवारांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवलीत ऐनवेळी अपक्षांसह काँग्रेस, उद्धवसेना, मनसेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने मतदानापूर्वीच महायुतीने विजयी जल्लोष साजरा केला आहे.
ठाणे महापालिकेत शिंदे सेनेचे सात उमेदवार बिनविरोध
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुरुवातीला १,१०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत ९९ अर्ज बाद झाले तर १ जानेवारी रोजी २७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच २ जानेवारीला अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने वागळे इस्टेट आणि वर्तकनगर भागात शिंदे सेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.