‘शरद पवार गट तयार नसेल तर काँग्रेस त्या दोन जागांवर लढण्याचा विचार करेल’, विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 20:02 IST2026-03-18T20:00:46+5:302026-03-18T20:02:12+5:30
Maharashtra Assembly By Election 2026: सहानुभूतीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही जागांवर निवडणूक लढवावी की नाही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार पक्ष द्विधा मनस्थितीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.

‘शरद पवार गट तयार नसेल तर काँग्रेस त्या दोन जागांवर लढण्याचा विचार करेल’, विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत
अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र सहानुभूतीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही जागांवर निवडणूक लढवावी की नाही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार पक्ष द्विधा मनस्थितीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. तसेच शरद पवार गट तयार नसेल तर काँग्रेस त्या दोन जागांवर पोटनिवडणूक लढण्याचा विचार करेल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत फारसा उत्सुक नसला तरी काँग्रेसने मात्र निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यातील दोन जागांवरील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष तयार नसेल, तर काँग्रेस पक्ष या जागा लढण्याचा विचार करेल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील दोन विधानसभांमधील पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडी काय निर्णय घेते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
राज्यातील दोन जागांवरील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष तयार नसेल, तर काँग्रेस पक्ष या जागा लढण्याचा विचार करेल!
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 18, 2026
बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याबाबत खा. सुप्रिया सुळे यांनी जी भूमिका घेतली त्याच्याशी काँग्रेस पक्ष सहमत नाही. ही त्यांची भूमिका असून, याबाबत महाविकास आघाडीत… pic.twitter.com/CbcV1phWWb
याबाबत माहिती देताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, बारामती विधानसभा मतदारसंघामधील निवडणूक न लढवण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी जी भूमिका घेतली त्याच्याशी काँग्रेस पक्ष सहमत नाही. ही त्यांची भूमिका असून, याबाबत महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा झालेली नाही. बारामतीत पोटनिवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तयार नसेल तर ती निवडणूक लढवण्याबबत काँग्रेस पक्ष विचार करेल, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यापैकी बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर राहुरीमध्ये मात्र महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वाट्याला आलेले आहेत. मात्र सहानुभूतीच्या लाटेमुळे या दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशा परिस्थितीत काँग्रेस आणि महायुती या दोन मतदारसंघातील निवडणुकीबाबतत काय निर्णय घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.