"जर कोणत्या मंत्र्यांने चांगली कामगिरी केली नाही, तर..."; प्रताप सरनाईक काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:29 IST2024-12-15T16:28:27+5:302024-12-15T16:29:43+5:30
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही जणांना अडीच वर्षासाठीच संधी दिली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी एक विधान केले आहे.

"जर कोणत्या मंत्र्यांने चांगली कामगिरी केली नाही, तर..."; प्रताप सरनाईक काय बोलले?
'आम्ही लोकांनी असं ठरवलं आहे की, काहींना अडीच वर्षांसाठी संधी द्यायची', असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी केले. त्यांच्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेतही अशा पद्धतीने निर्णय होईल, असे म्हटले आहे. चांगली काम केले नाही, तर गच्छंती अटळ आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले. ते म्हणाले, "एकनाथ शिंदेंनी माझा विचार केला, त्याबद्दल पक्षाचे प्रमुख म्हणून मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्ष संघटना वाढवायची आहे. पक्ष कसा मोठा होईल, पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कसा न्या मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे."
अजित पवारांच्या अडीच वर्ष मंत्रिपदाच्या भूमिकेवर प्रताप सरनाईकांनी भाष्य केले.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
सरनाईक म्हणाले, "चांगलं काम करणार नसेल, तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून ते करतील. आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदे साहेबही करतील. जर चांगली कामगिरी कुठल्या मंत्र्यांने केली नाही आणि कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही, मोठं केलं नाही. कार्यकर्त्यांना संजीवनी मिळाली नाही, तर निश्चितपणे त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आमच्या पक्षातही तेच होणार आहे. जर कोणत्या मंत्र्यांने चांगली कामगिरी केली नाही, तर त्याची गच्छंती अटळ आहे", असे प्रताप सरनाईक म्हणाले.
अजित पवार काय म्हणालेले?
नागपूरमध्ये झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात. पण ज्यावेळी आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळी काहींना दीड वर्षाची कारकिर्द मिळाली आहे. या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारणपणे आम्ही लोकांनी असं ठरवलं आहे की, काहींना अडीच वर्षांसाठी संधी देण्यात येणार आहे. म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्यामध्ये सामावून घेतले जातील. अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळेल. तिघांमध्येही याबाबत एकवाक्यता झालेली आहे याची कृपया नोंद घ्यावी."