मी अडीच महिन्यांसाठी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो; अजित पवारांचे फडणवीसांसमोरच वक्तव्य, अन् चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 07:57 IST2024-12-16T07:53:48+5:302024-12-16T07:57:22+5:30
Ajit pawar on CM Post Statement: फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले असून एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे.

मी अडीच महिन्यांसाठी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो; अजित पवारांचे फडणवीसांसमोरच वक्तव्य, अन् चर्चांना उधाण
राज्यात महायुतीचे प्रबळ सरकार स्थापन झाले आहे. प्रचंड बहुमत असलेल्या या सरकारमधील मंत्र्यांचा अगदी हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी झाला. यावेळी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले असून एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे.
शपथ घेतलेल्या ३३ कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भाजपचे १९ शिंदेसेनेचे ११ आणि अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्राला सर्वात जास्त १० मंत्रिपदे मिळाली. त्या खालोखाल विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला प्रत्येकी आठ मंत्रिपदे मिळाली. शिंदे सरकारमधील १२ मंत्र्यांचा पत्ता कापण्यात आला. यामुळे काहीशी नाराजी असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मंत्रिपद २.५ वर्षांचेच असल्याचे स्पष्ट केले आहे.
जास्त आमदार निवडून आल्याने, तसेच तीन पक्षांत मंत्रिपदे वाटली गेल्याने सर्वांनाच संधी मिळालेली नाही. जुन्या चेहऱ्यांना वगळून २० नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री कधी होतील असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर अजित पवारांनी अडीज वर्षांच्या मंत्रिपदाचा धागा पकडत मी अडीच महिन्यासाठी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, असे सांगितले. अजित पवारांच्या या उत्तराने हशा पिकला असला तरी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.
छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. यामुळे भुजबळ कमालीचे संतप्त झाले असून, त्यामुळेच ते मेळाव्याला उपस्थित राहिले नसल्याची चर्चा मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये होती. या घडामोडीमुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून, नागपूरच्या बोचऱ्या थंडीत राजकीय वातावरण तापले आहे.