मराठा-ओबीसी वाद लावण्याचा सरकारचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटील यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:49 IST2025-08-09T16:48:29+5:302025-08-09T16:49:10+5:30
महायुती सरकारमुळे मोदींना डाग..

मराठा-ओबीसी वाद लावण्याचा सरकारचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटील यांची टीका
फलटण : सगळे मराठे मुंबईमध्ये येणार आहेत. यावेळी आपण ‘एक घर एक गाडी’ असा नारा दिला आहे. त्यामुळे तमाम मराठा समाजाला आव्हान आहे की, यावेळी कोणीही घरी थांबू नये. ही अस्तित्वाची व अंतिम लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत समाज हरता कामा नये, मराठ्यांचे हसू होईल, असे एकही मराठ्याने आता वागू नये, राजकारण बाजूला ठेवूऊन मराठ्यांनी एकत्र येणे गरजेचं आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. तसेच, राज्यातील सरकार मराठा आणि ओबीसी यांचा वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यापासून सावध रहावे, असेही पाटील म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व समन्वयकांची बैठक फलटण येथील सजाई गार्डन येथे शुक्रवारी झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाज शांततेत आपली मागणी मांडतो. शांततेत मुंबईला जातो, शांततेत येतो, याचा गैरफायदा सरकार उचलत आहे. यावेळी ताकतीने मुंबईला एकत्र येणे गरजेचे आहे. सरकारला दंगली घडवायच्या आहेत. पण आम्ही मराठी व ओबीसीत वाद होऊ देणार नाही.
महायुती सरकारमुळे मोदींना डाग..
राज्यातील महायुतीच्या सरकारच्या वागण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देखील अडचणीत येणार आहे. ते ओबीसीची बैठक गोव्यात घेत आहेत, त्यांचा वापर ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात करीत आहेत. मराठ्यांनी आता बेसावध राहू नका. कुठेही दंगल होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. ओबीसींच्या अंगावर जाऊ नका, असे आवाहनही जरांगे यांनी केले.