'a friend in need is a friend indeed' became true in Satara Loksabha bypoll; Sharad pawar called shrinivas patil to fight against Udayan Raje bhosale | मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी'

मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी'

मुंबई : अवघ्या चार महिन्यांत राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जोरदार लढत दिली आणि साताऱ्याची जागा खेचून आणली. उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये 87,717 एवढ्या मोठ्या फरकाने पराभव झाला. 


लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचे गेल्या वेळेपेक्षा मताधिक्य निम्म्याने घटले होते. मात्र, भाजपातून पोटनिवडणूक लढविताना त्यांना धक्कादायक पराभव पहावा लागला. खरेतर सातारा ही छत्रपतींची राजगादी. येथे उदयनराजे प्रचंड मताधिक्याने निवडून येत होते. राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी नुकताच भाजप प्रवेश केला होता. लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकीत त्यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला होता. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी लढत दिली होती. मात्र, उदयनराजे भाजपात गेल्याने शिवसेनेने पोटनिवडणुकीपुरती सीट सोडल्याचे सांगितले होते. 

काल लागलेल्या निकालामध्ये उदयनराजेंचा जवऴपास 90 हजार मतांनी पराभव झाला. मात्र, त्यांना आधीच्या निवडणुकांत मिळत असलेले लीड पाहता त्यांच्याविरोधात उभे राहण्यासाठी तुल्यबळ उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीकडे नव्हता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, त्यांनीही माघार घेत नकार दिला. उदयनराजेंसमोर कोण उमेदवार द्यायचा हा प्रश्न शरद पवारांसमोर उभा होता. पवारांनी त्यांच्याच वयाच्या परममित्राला साद दिली आणि हा माणूस एका पायावर उदयनाराजेंविरोधात लढण्यासाठी तयार झाला.

हा व्यक्ती म्हणजे साताऱ्याचे नवनियुक्त खासदार श्रीनिवास पाटील होय. पाटील हे साताऱ्यातूनच दोनवेळा लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. 2004 आणि 2009 ला ते खासदार झाले होते. याशिवाय जवळपास 35 वर्षे भारतीय प्रशासकीय सेवेत काम केले आहे. आघाडीच्या काळात सिक्कीमचे राज्यपालही राहिलेले आहेत. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाटील यांनी शरद पवारांच्या हाकेला होकार दिला. साताऱ्याचा निकाल फिरवला गेला तो प्रचाराच्या शेवटच्या दिवशी असे बोलले जात आहे. पवार यांनी भर पावसात भाषण केले होते. पण उदयनराजेंविरोधात उभे राहताना पाटील यांनी जय-पराजयाचा विचार केला नव्हता. समोर पराभव दिसत होता. पण त्यांनी सहा दशकांच्या मैत्रीखातर पवारांच्या एका शब्दावर खांद्याला खांदा लावून निवडणूक लढविली आणि जिंकली. राजकारण हरले पण मैत्री जिंकली अशीच भावना दिवसभर सातारकरांच्या मनामध्ये होती.  

मैत्री कधीपासून?

शरद पवार यांनी यावर सांगताना आम्ही दोघे कॉलेजपासूनचे मित्र आहोत. काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या काळात काम केले. नंतर श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेत गेले. मी मुख्यमंत्री असताना ते अधिकारी होते. सामाजिक बांधिलकीतून काम करत होते. योग्य अंतर ठेवले. सणावाराला मी त्यांच्या घरी जायचो, ते यायचे. यामुळे आमची मैत्री इतकी वर्षे टिकल्याचे रहस्य शरद पवार यांनी सांगितले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'a friend in need is a friend indeed' became true in Satara Loksabha bypoll; Sharad pawar called shrinivas patil to fight against Udayan Raje bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.