फेमस युट्यूबरनं घेतली शरद पवारांची भेट; हातकणंगले मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 13:12 IST2024-03-15T13:11:26+5:302024-03-15T13:12:25+5:30
कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघात विद्यमान खासदार धैयर्शील माने हे शिवसेना शिंदे गटात आहे. या जागेवर राजू शेट्टीही इच्छुक आहेत

फेमस युट्यूबरनं घेतली शरद पवारांची भेट; हातकणंगले मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक
मुंबई - आगामी लोकसभा मतदारसंघासाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यात इच्छुक उमेदवारांची संख्याही अधिक आहे. नुकतेच कोल्हापूरमधील प्रसिद्ध युट्यूबर धनंजय पोवार जे DP नावानेही ओळखले जातात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.
धनंजय पोवार हे इचलकरंजी हातकणंगले मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्याबाबतच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. हातकणंगले ही जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे आहेत. धनंजय पोवार हे निवडणुकीला उभे राहू इच्छितात. त्यासाठी त्यांनी पवारांची भेट घेत त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली. यावेळी शरद पवारांनीही त्यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार आता माझी पुढची वाटचाल होईल असं धनंजय पोवार यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघात विद्यमान खासदार धैयर्शील माने हे शिवसेना शिंदे गटात आहे. या जागेवर राजू शेट्टीही इच्छुक आहेत. ठाकरे गट ही जागा शेट्टी यांना सोडणार असल्याची माहिती आहे.
कोण आहे धनंजय पोवार?
डीपी म्हणून प्रसिद्ध असलेला धनंजय पोवार आणि त्याचं कुटुंब आज राज्यातल्या घराघरांत पोहोचलंय. पोवार कुटुंबीयांनी तयार केलेले फनी व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच धुमाकूळ घालतात. नवरा-बायकोमधील जुगलबंदी आणि त्यातली मजा हे कुटुंब सादर करतं. गेल्या काही वर्षांमध्ये धनंजय पोवार यांनी हजारो व्हिडीओ आपल्या यूट्यूब चॅनलवरून शेअर केले आहेत. हजरजबाबीपणा आणि त्यातून तयार होणारे विनोद यात डीपीचा हात धरणं अशक्यच आहे.
धनंजय पोवारच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ‘धनंजय पोवार डीपी’. सध्या त्याच्या यूट्यूब चॅनलवर ८ लाख ९ हजार पेक्षाही अधिक सबस्क्रायबर्स आहेत. १ मे २०२० रोजी त्यानं आपल्या चॅनलची सुरुवात केली आणि पाहता पाहता अवघ्या काही वर्षांत तो महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचला. हास्य विनोदाच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला धनंजय पोवार आता थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्याने रिल्सच्या माध्यमातून प्रचारही सुरु केला आहे.