देवेंद्र फडणवीस, अजित पवार वर्षावर आले, शिंदेंना सोबत घेऊन राजभवनावर गेले; सत्ता स्थापनेचा दावा केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:20 IST2024-12-04T15:19:40+5:302024-12-04T15:20:07+5:30
Devendra Fadnavis CM Post oath: थोड्याच वेळात हे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. राज्यपाल भवनात तिन्ही नेते एकत्र बसलेले आहेत. तसेच प्रफुल्ल पटेल हे पवारांच्या बाजुला बसलेले आहेत.

देवेंद्र फडणवीस, अजित पवार वर्षावर आले, शिंदेंना सोबत घेऊन राजभवनावर गेले; सत्ता स्थापनेचा दावा केला
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने आज राज्यपालांच्या भेटीला देवेंद्र फडणवीसांसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकतेच तिन्ही पक्षांचे नेते राजभवनावर पोहोचले आहेत. शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी फडणवीस आणि अजित पवार गेले होते. यानंतर तिन्ही नेते राजभवनावर पोहोचले व सत्तास्थापनेचा दावा केला.
शिंदे आणि फडणवीस हे एकाच कारमधून राजभवनावर पोहोचले आहेत. या कारमध्ये गिरीष महाजनही होते. तर अजित पवार हे त्यांच्या कारमधून आले, अजित पवारांसोबत धनंजय मुंडे कारमध्ये होते. भाजपाचे अन्य काही आमदारही राजभवनावर पोहोचले. यानंतर थोड्याच वेळात या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.
५ वर्षांनी ते पुन्हा आले!
देवेंद्र फडणवीस हे राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. २०१४ साली फडणवीसांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा भव्यदिव्य सोहळा पार पडला होता. २०१४ ते २०१९ सलग ५ वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले होते. २०१९ च्या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्या राजकीय घडामोडीत अजित पवारांनासोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. परंतु अवघ्या ७२ तासांत त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. २०१९ मध्ये फडणवीसांनी निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, याच निर्धाराने अशी घोषणा केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या खेळीमुळे फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागले. त्यानंतरच्या काळात विरोधकांनी मी पुन्हा येईन घोषणेवरून फडणवीसांची खिल्ली उडवली परंतु आज ५ वर्षांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहेत.