हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द...; लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंनी केलं आश्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 20:56 IST2024-12-19T20:56:16+5:302024-12-19T20:56:54+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे.

हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द...; लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंनी केलं आश्वस्त
Eknath Shinde ( Marathi News ): "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात १४०० कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे," अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली आहे.
सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली. ८९ लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देत आहोत. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत ३४ हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झालाय. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून १२३ कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर ९ शहरांतून तीर्थयात्रा सुरु झाली आहे. ६ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत," असा दावा शिंदे यांनी केला.
लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेला नवीन निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाईल, असा आरोप सरकारवर केला जात होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, "कोणीही कसलीही शंका मनात ठेवू नये. आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत, ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवलं, त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत," अशी माहिती फडणवीस यांनी दिली.