"कधीतरी लक्षात घ्या की तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:56 IST2024-12-09T12:52:34+5:302024-12-09T12:56:10+5:30

DCM Ajit Pawar : विधानसभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

DCM Ajit Pawar criticizes Maha Vikas Aghadi leaders over demand for voting in Markadwadi | "कधीतरी लक्षात घ्या की तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

"कधीतरी लक्षात घ्या की तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

Maharashtra Legislative Assembly Special Session 2024 : विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राहुल नार्वेकर यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. तसेच बोलताना मारकडवाडीतील घटनेवरूनही अजित पवार यांनी भाष्य केलं. मारकडवाडीमध्ये बॅलेट पेपरमध्ये मतदान घेण्यावरुन महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. शरद पवार यांनीही मारकडवाडीला भेट देत ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली. त्यावरुन बोलताना तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे. आमची बाजू खरी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराला विरोध करत सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. निवडणुकीत ईव्हीएमवर शंका घेत माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या गटाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मात्र ही मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला. त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे शरद पवार यांनी मारकडवाडीत जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. उगीच काहीतरी स्टंटबाजी केली जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

"निवडणुकीच्या काळात अनेकजण स्टेजवर संविधान हातात घ्यायचे. संविधान हातात घेतलं तरच संविधानाबद्दल आदर वाटतो का तर असं नाही. एकनाथ शिंदे म्हणाले की ते कोरं होतं. संविधानाच्या तरतुदी त्यांनी वाचलेल्या नाहीत असं माझं मत आहे. किंवा वाचून ते त्याचे उल्लंघन करत आहेत असं म्हणावं लागेल. संविधानाच्या अनुच्छेद १८८ मधील तरतुदीनुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्याने त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणे आवश्यक आहे. शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळसरळ भंग आहे. जरा कळ काढल्यानंतर शपथ घेण्यात आल्या," असं अजित पवार यांनी म्हटलं.

"संविधानाच्या अनुच्छेद कलम ३२४ नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे. कायद्याने, नियमाने आणि देशाने हा अधिकार दिलेला आहे. सामान्य जनतेला हा अधिकार नाही. अनुच्छेद ३२९ मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पीटिशन दाखल करुन द्यावं लागतं. उगीच काहीतरी स्टंटबाजी करायची. मारकडवाडीकरता आम्हालाही आपलेपणा आणि प्रेम आहे. पण कारण नसताना एक असा बाऊ केला जातोय. कधीतरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे. आमची बाजू खरी आहे," असंही अजित पवार म्हणाले.
 

Web Title: DCM Ajit Pawar criticizes Maha Vikas Aghadi leaders over demand for voting in Markadwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.