"मतदारयादी घोटाळ्याविरोधात कांग्रेस राज्यव्यापी अभियान राबवणार’’, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:56 IST2025-02-28T18:56:14+5:302025-02-28T18:56:46+5:30

Congress News: विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा युतीचे हे फिक्सिंग सरकार आहे. मतदारयाद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

"Congress will conduct a statewide campaign against voter list scam", announced Harsh Vardhan Sapkal | "मतदारयादी घोटाळ्याविरोधात कांग्रेस राज्यव्यापी अभियान राबवणार’’, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

"मतदारयादी घोटाळ्याविरोधात कांग्रेस राज्यव्यापी अभियान राबवणार’’, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

मुंबई -  महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळा करून भाजपा युतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. परंतु केंद्र सरकार व निवडणूक आयोग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंवैधानिक सरकार स्थापन करण्यात आले होते, तर त्यानंतर विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा युतीचे हे फिक्सिंग सरकार आहे. मतदारयाद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य गुरदीप सप्पल, डेटा अनालिटिक्स विभाग व प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सह प्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ व वाढवलेले मतदार यासंदर्भात राज्यातील ३० विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधींची बैठक टिळक भवन येथे पार पडली. 

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतदार याद्यातील घोटाळ्याची माहिती काँग्रेस शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला मागितली तरी ते देण्यास टाळाटाळ करत आहेत. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी केली पण चोराच्या मनात चांदणे याप्रमाणे सरकार चौकशीपासून पळ काढत आहे. म्हणून हा मुद्दा आता जनतेच्या दरबारात घेऊन जाण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला आहे असे सपकाळ म्हणाले.

यावेळी बोलताना गुरुदीप सप्पल म्हणाले की, मतदार संख्या वाढीसंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली असता त्यांनी तीन महिन्यांची वेळ मागितली होती आणि आता पुन्हा तीन महिन्यांची वेळ न्यायालयाकडे मागितली आहे. सिस्टिम फुलप्रुफ आहे एवढेच निवडणूक आयोग सांगते, पण माहिती मात्र देत नाही. निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती आहे, केवळ कॉपी पेस्ट करून ती द्यायची आहे, त्यासाठी सहा महिन्यांचा वेळ का लागतो? असा सवाल सप्पल यांनी उपस्थित केला आहे. 

यावेळी प्रविण चक्रवर्ती म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पाच महिन्याच्या काळात ४० लाख मतदार वाढले, ही संख्या मागील पाच वर्षांतील मतदारवाढीपेक्षा जास्त आहे. अनेक मतदारसंघात बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. विधानसभेला भाजपा युतीला लोकसभेपेक्षा ७० लाख मतदान जास्त झाले आणि तेवढेच मतदान भाजपा युतीला मविआपेक्षा जास्त झाले. मविआची लोकसभा व विधानसभेतील मते मात्र सारखीच आहेत. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे, असे चक्रवर्ती म्हणाले.

Web Title: "Congress will conduct a statewide campaign against voter list scam", announced Harsh Vardhan Sapkal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.