काँग्रेसला धक्का! उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, शिर्डीतून उमेदवारी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:07 AM2024-04-18T10:07:08+5:302024-04-18T10:40:48+5:30

lok sabha election 2024 : उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या.

congress leader utkarsha rupwate joined vba may contest from shirdi seat, lok sabha election 2024 | काँग्रेसला धक्का! उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, शिर्डीतून उमेदवारी मिळणार?

काँग्रेसला धक्का! उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, शिर्डीतून उमेदवारी मिळणार?

अकोला :  महाविकास आघाडीकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी काल काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उत्कर्षा रुपवते यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट) गेली. त्यामुळे काँग्रेसकडून वारंवार लोकसभेची उमेदवारी नाकारली जात असल्याने उत्कर्षा रुपवते नाराज होत्या. अखेर उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. आता उत्कर्षा रूपवते वंचितकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी करण्याची शक्यता  वर्तविली जात आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे, महायुतीकडून सदाशिव लोखंडे आणि वंचितने उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर केल्यास तिरंगी लढत होऊ शकते. 

उत्कर्षा रूपवते या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी करत होत्या. मात्र, या जागेसाठी ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली होती. तसेच, शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी उत्कर्षा रुपवते या वंचितच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. उत्कर्षा रुपवते यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट सुद्धा घेतली होती.  

दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडे पुण्यातील उद्योजक विनोद अहिरे यांनीही उमेदवारीची मागणी केली होती. विनोद अहिरे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यामुळे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचितकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

 

Web Title: congress leader utkarsha rupwate joined vba may contest from shirdi seat, lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.