छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते; गुजरातच्या भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:26 IST2026-01-06T16:25:38+5:302026-01-06T16:26:36+5:30
छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं सांगून भाजपा नेत्यांनी शिवप्रेमी जनतेची नाराजी ओढावून घेतली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते; गुजरातच्या भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान
मुंबई - राज्यात २९ महापालिका निवडणुका सुरू आहेत. त्यातच भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं विधान करत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते सी.आर.पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. सूरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात बोलताना पाटलांनी हे विधान केले. मात्र सी.आर.पाटील यांच्या विधानावरून महाराष्ट्रातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती दाखवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
सी.आर पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते त्याचा मला आनंद आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा यशस्वी प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलं आहे. सी.आर पाटील यांनी हे विधान अशावेळी केले आहे जेव्हा महाराष्ट्रात २९ महापालिका निवडणुका आहेत. त्यात मुंबई महापालिकेत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत असा आरोप विरोधक सातत्याने सत्ताधारी महायुतीवर करत आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं सांगून भाजपा नेत्यांनी शिवप्रेमी जनतेची नाराजी ओढावून घेतली आहे.
याबाबत खासदार संजय राऊत यांनी कडाडून समाचार घेतला आहे. मी सी.आर पाटील यांचे भाषण ऐकले. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांना गुजराती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे आणि मराठा साम्राज्याचे राजे आहेत. हा महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा फार मोठा अपमान आहे. अनेक युगपुरुष भारतीय जनता पार्टीने पळवायचा प्रयत्न केला. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर हे पळवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी आता छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवायचा प्रयत्न करत आहेत अशी टीका राऊतांनी केली.
कोण आहेत सी.आर पाटील?
गुजरातमधील चंद्रकांत पाटील यांना सी.आर पाटील म्हणून ओळखले जाते. ते गुजरातच्या राजकारणातील भाजपाचा प्रमुख चेहरा आहेत. सध्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर जलशक्ती मंत्रालयाची जबाबदारी आहे. गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू अशी सी.आर.पाटील यांची ओळख आहे. त्यांचे मूळ गाळ महाराष्ट्रातील जळगाव येथे असले तरी संपूर्ण राजकीय आणि सामाजिक कारकिर्द गुजरातमध्येच घडली आहे.