चंद्रपूरमध्ये महापौरपदाचा तिढा, उद्धवसेना भाजपासोबत जाणार का? संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:49 IST2026-02-05T12:37:11+5:302026-02-05T12:49:06+5:30
Chandrapur Municipal Corporation Mayor Election: चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असलेली उद्धवसेना भाजपासोबत जाऊन महापौरपदासाठी युती करणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपासोबतच्या संभाव्य युतीच्या चर्चांवर उद्धवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे.

चंद्रपूरमध्ये महापौरपदाचा तिढा, उद्धवसेना भाजपासोबत जाणार का? संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले…
गेल्या महिन्यात झालेल्या महानगपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यापासून विदर्भातील चंद्रपूर महानगरपालिकेतील घडामोडी ह्या चर्चेचा विषय ठरत आहेत. येथे काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र काँग्रेसमधील वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन गटांमध्ये मतभेद उफाळून आल्याने महापौरपदाबाबत तिढा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पालिकेमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असलेली उद्धवसेना भाजपासोबत जाऊन महापौरपदासाठी युती करणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपासोबतच्या संभाव्य युतीच्या चर्चांवर उद्धवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेमधील घडामोडी आणि भाजपासोबतच्या संभाव्य युतीबाबत संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरबाबत एक निर्णय घेतला आहे. तसेच मी याबाबत काल दिल्लीतही सांगितलं होतं. उद्धवसेनेचे चंद्रपूरमधील नगरसेवक हे एकवेळ विरोधी पक्षात बसतील, पण कोणत्याही परिस्थितीतीमध्ये भाजपासोबत जाणार नाहीत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील वडेट्टीवार गट आणि धानोरकर गटाने प्रत्येकी अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली आहे. मग उद्धवसेनेची अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी कशी पूर्ण होणार, असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, आम्ही त्याबाबत पाहू. ही बाब आमच्यावर सोडा. या गोष्टी प्रसारमाध्यमांवर सोडून चालत नाही. चर्चेला तुम्ही जाणार आहात की आम्ही. आमची लोकं चर्चेला जातील, असे राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, ६६ सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. तर काँग्रेसच्या मित्रपक्षाचे ३ नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपाला २४ जागा मिळाल्या आहेत. याबरोबरच वंचितचे दोन आणि दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. तर उद्धवसेनेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे येथे उद्धवसेनेची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.