“…तर आत्ता राजीनामा देतो”; १ कोटीच्या संदीप देशपांडेच्या आरोपांवर ठाकरेंच्या नेत्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:56 IST2026-02-12T15:55:51+5:302026-02-12T15:56:47+5:30

Chandrapur Mayor Election 2026: आम्ही जे काही केले ते स्वाभिमानासाठी केले, संदीप देशपांडे यांनी शिवसैनिकांचा अपमान करू नये, असा पलटवार उद्धवसेनेकडून करण्यात आला.

chandrapur mayor election 2026 thackeray group sandeep girhe replied mns sandeep deshpande criticism | “…तर आत्ता राजीनामा देतो”; १ कोटीच्या संदीप देशपांडेच्या आरोपांवर ठाकरेंच्या नेत्याचे आव्हान

“…तर आत्ता राजीनामा देतो”; १ कोटीच्या संदीप देशपांडेच्या आरोपांवर ठाकरेंच्या नेत्याचे आव्हान

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेत २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा गटबाजीने महापौरपदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. भाजपाने थेट उद्धवसेनेच्या पाठिंब्याने पालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळविले. भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताने काँग्रेसच्या वैशाली महाडुळेंचा पराभव करत महापौरपदी विजय मिळवला. उपमहापौरपदासाठी उद्धवसेनेचे प्रशांत दानव व काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख यांना समसमान ३२ मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने दानव यांची निवड झाली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठा दावा केला आहे. याला उद्धवसेनेच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देताना आव्हान दिले. 

चंद्रपूर महापालिकेसंदर्भात मला मिळालेली माहिती आहे की, उद्धवसेनेच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आले आहेत. वरून त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत. असा मोठा दावाही संदीप देशपांडे यांनी केला. तसेच खासदार संजय राऊत यांना अंधारात ठेवले की त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधली, हे पाहावे लागेल. संजय राऊत यांचे असे झाले आहे की, 'तुम करे तो रासलीला आणि हम करे तो कॅरेक्टर ढिला', असे कसे चालेल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते. याला उद्धवसेनेचे चंद्रपूर येथील जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

…तर आत्ता राजीनामा देतो

संदीप देशपांडे यांना ही माहिती कुणी दिली, ते आम्हाला माहिती नाही. संदीप देशपांडे यांनी त्या व्यक्तीचे नाव जाहीर करावे. त्यांनी सांगितले की, कुणी आम्हाला पैसे देऊन विकत घेतले असेल, तर आत्ता मी या पदाचा राजीनामा देतो. आम्ही स्थानिक लढाई लढलो. आमच्या इथे जे राजकारण झाले, ते आमचे आम्हाला माहिती आहे. काँग्रेसने वारंवार आमचा अपमान केला. आम्ही अनेकवेळा काँग्रेसच्या ऑफिसमध्ये बसून होतो. आम्ही वडेट्टीवारांच्या यांच्या घरी जाऊन बसलो होतो. भाजपाकडून पैसे घेतले असते किंवा घ्यायचे असते, तर आम्ही हे सगळे केले नसते, असे प्रत्युत्तर संदीप गिऱ्हे यांनी दिले.

शिवसैनिकांचा अपमान करू नये

काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमचा कितीदा अपमान केला, हे आम्हालाच माहिती आहे. आम्हाला भाजपाकडून पैसे घ्यायचे असते तर शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत वाटाघाटी केली नसती. १ कोटी आले असते तर आलिशान हॉटेलमध्ये बसून चर्चा केली असती. आम्ही जे काही केले ते स्वाभिमानासाठी केले, संदीप देशपांडे स्वतः शिवसैनिक राहिलेले आहे, त्यामुळे त्यांनी असा शिवसैनिकांचा अपमान करू नये, त्यांनी पुरावा द्यावा, आम्ही सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी राजीनामा देतो, असे आव्हान संदीप गिऱ्हे यांनी दिले.

दरम्यान, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सोबतच राहण्याचे निर्देश होते. त्यानुसारच आम्ही काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यांनी जिथे म्हटले तिथे चर्चेसाठी गेलो. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबतच आम्ही चर्चा करत होतो. आम्हाला शिवसेनेची गरज नाही असे त्यांचे मत होते. आमचा वारंवार अपमान केला जात होता. स्थानिक परिस्थिती ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती. त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही निर्णय घेतला. शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ते टिकले पाहिजे हीच भावना होती. मला विश्वास आहे की, उद्धव ठाकरे आमच्या या भावना समजून घेतील. स्थायी समितीचे अध्यक्ष पद आम्हाला मिळणार आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना भेटणार आहोत, असेही संदीप गिऱ्हे यांनी सांगितले होते. 

 

Web Title : "तो अभी इस्तीफा दे दूंगा"; संदीप देशपांडे के आरोपों पर ठाकरे नेता की चुनौती

Web Summary : उद्धव सेना के चंद्रपुर जिलाध्यक्ष संदीप गिर्हे ने चंद्रपुर महापौर चुनाव में रिश्वतखोरी के मनसे नेता संदीप देशपांडे के दावे का खंडन किया। गिर्हे ने देशपांडे को सबूत देने या इस्तीफे का सामना करने की चुनौती दी, और कांग्रेस के बार-बार अनादर के कारण भाजपा के साथ गठबंधन करने और पार्टी के अस्तित्व को प्राथमिकता देने के अपने फैसले का बचाव किया।

Web Title : "I'll Resign Now!": Thackeray Leader Challenges Deshpande's Allegations of Corruption.

Web Summary : Uddhav Sena's Chandrapur district president, Sandeep Girhe, refuted MNS leader Sandeep Deshpande's claim of bribery in the Chandrapur mayoral election. Girhe challenged Deshpande to provide proof or face resignations, defending their decision to align with BJP due to Congress's repeated disrespect and prioritizing party survival.